
नवी दिल्ली : देशभरातील सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या (Petrol and Diesel prices increased) दरात प्रति लिटर ३ रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. जागतिक ऊर्जा बाजारातील अस्थिरता, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किमती आणि इराणमधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या तणावाचा थेट परिणाम भारतीय इंधन बाजारावर झाला आहे. शुक्रवारी तेल कंपन्यांनी दरवाढीची घोषणा करताच अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर शंभरीपार गेले आहेत.
गेल्या अनेक महिन्यांपासून इंधनाचे दर स्थिर होते. मात्र अचानक झालेल्या या वाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार असून; वाहतूक, किराणा आणि इतर अत्यावश्यक वस्तूंच्या किमती वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळात महागाई आणखी भडकण्याची भीती निर्माण झाली आहे.
दरवाढीनंतर नवी दिल्लीत (New Delhi) पेट्रोलचा दर ९४.७७ रुपयांवरून ९७.७७ रुपये प्रति लिटर झाला आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोलच्या किमतीने पुन्हा शंभरी ओलांडत १०६.६८ रुपये प्रति लिटरचा टप्पा गाठला आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्येही पेट्रोलच्या दरात तब्बल ३.२९ रुपयांची वाढ झाली आहे. डिझेलच्या किमतीतही मोठी वाढ झाल्याने मालवाहतूक खर्च वाढण्याची शक्यता आहे.
ऊर्जा संकट आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे आगामी काळात इंधन दर आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे केंद्र सरकार दरकपातीसाठी काही दिलासा देणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.