फिजिओथेरपिस्ट ते जननेता; डॉ. केतन भाटीकरांची अकाली एक्जिट मनाला चटका लावणारी

मगो ते काँग्रेस; डॉ. भाटीकरांची राजकीय कारकीर्द नेहमीच संघर्षमय राहिली.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
10 mins ago
फिजिओथेरपिस्ट ते जननेता; डॉ. केतन भाटीकरांची अकाली एक्जिट मनाला चटका लावणारी

पणजी : गोव्याच्या वैद्यकीय आणि राजकीय क्षेत्रातील एक अत्यंत आश्वासक तसेच जनसामान्यांशी नाळ जोडलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. केतन भाटीकर. क्रीडा मैदानांपासून जनसामान्यांत ज्यांचे नाव आदराने घेतले जात होते, त्या डॉ. भाटीकरांचा जीवनप्रवास नियतीने अत्यंत क्रूरपणे थांबवला आहे. दांडेलीहून गोव्याकडे परतत असताना अनमोड घाटात घडलेल्या एका दुर्दैवी घटनेने गोव्याच्या राजकारणातील 'स्पार्क' कायमचा विझला असून, संपूर्ण राज्यावर सध्या शोककळा पसरली आहे.


MGP leader Ketan Bhatikar under ONGC scanner for failing to pay GCL money -  Goa News Hub

एक योगायोग असाही; १५ महिने, १५ तारीख, ३ नेते...

माजी आमदार लवू मामलेदार यांची १५ फेब्रुवारी २०२५ रोजी हत्या झाली. त्यानंतर, कृषिमंत्री रवी नाईक यांचे १५ ऑक्टोबर २०२५ रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आता काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचा १५ मे २०२६ रोजी सर्पदंशाने मृत्यू झाला. गेल्या १५ महिन्यांत फोंडा मतदारसंघातील ३ नेत्यांचा १५ तारखेलाच मृत्यू झाला. हा केवळ एक विचित्र योगायोग!


 

नेमके काय घडले?

उपलब्ध माहितीनुसार, डॉ. भाटीकर आणि त्यांचे एक सहकारी सुशांत कवळेकर गुरुवारी मध्यरात्री दांडेलीहून गोव्याच्या दिशेने कारने येत होते. लघुशंकेसाठी अनमोड घाटात कार उभी केली असता, डॉ. भाटीकर खाली उतरले. याच दरम्यान त्यांचा मोबाईल खाली पडला आणि तो उचलण्यासाठी ते वाकले असता त्यांना सर्पदंश झाला. त्यांच्यासोबत असलेल्या कवळेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या वेळी परिसरात पाऊस सुरू होता आणि दाट चिखलामुळे मदत मिळवण्यात अनेक अडथळे येत होते. रेंज नसल्याने संपर्क करणे कठीण झाले होते. माझे हातपाय गार पडले होते, काहीच सुचत नव्हते, अशा शब्दांत त्यांच्या सहकाऱ्याने त्या रात्रीचा थरार मांडला. पहाटे ३:३२ च्या सुमारास त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून धारबांदोडा आरोग्य केंद्रात आणण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली होती.




वैद्यकीय क्षेत्रातील 'एक्स्पर्ट' ते राजकारणातील 'बुलंद आवाज'

डॉ. केतन भाटीकर हे केवळ एक राजकारणी नव्हते, तर ते भारतातील अग्रगण्य फिजिओथेरपिस्ट होते. ऑर्थोपेडिक आणि स्पोर्ट्स फिजिओथेरपीमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवल्यानंतर त्यांनी फोंडा आणि मडगाव येथे 'स्पार्क' (SPARC) या नावाने अत्याधुनिक फिजिओथेरेपी क्लिनिक्स सुरू केली. लंडनमध्ये अ‍ॅक्वेटिक थेरपीचे प्रशिक्षण घेतलेले ते गोव्यातील मोजक्या तज्ज्ञांपैकी एक होते. गोवा रणजी संघ, गोवा क्रिकेट असोसिएशन आणि २०१५ च्या फुटबॉल युनिटी वर्ल्ड कपमध्ये त्यांनी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. 'फिजिओ युथ आयकॉन' आणि 'क्लिनिकल एक्सलन्स' यांसारख्या अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले होते.


Gallery - Ketan Bhatikar's SPARC


राजकीय कारकीर्द आणि अपूर्ण स्वप्न

डॉ. भाटीकरांनी आपली राजकीय कारकीर्द २०१७ साली गोवा सुरक्षा मंच या पक्षातून सुरू केली. भारतीय भाषा सुरक्षा मंचच्या माध्यमातून त्यांनी पणजीची निवडणूक लढवून सर्वांचे लक्ष वेधले होते. २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षातर्फे लढताना त्यांनी भाजपचे दिग्गज नेते रवी नाईक यांना कडवी झुंज दिली होती. केवळ ७७ मतांच्या अल्प फरकाने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. रवी नाईकांचे अकाली निधन आणि नुकत्याच झालेल्या राजकीय घडामोडींनंतर त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. फोंडा पोटनिवडणुकीसाठी ते पक्षाचे प्रबळ उमेदवार मानले जात होते. "फोंडेकर" हा केंद्रबिंदू मानून त्यांनी गेल्या सात वर्षांपासून तळागाळातील लोकांसाठी मोफत रुग्णवाहिका सेवा आणि आपत्ती व्यवस्थापन गट सक्रिय ठेवला होता.


The Goan EveryDay: SPOTLIGHT | Congress's Bhatikar bets on past numbers,  personal vote bank


अधुरे राहिले विधानसभेचे स्वप्न

आमदार बनून फोंड्याचा कायापालट करण्याचे आणि युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्याचे डॉ. भाटीकर यांचे स्वप्न आता अधुरे राहिलेच आहे. एक स्वच्छ प्रतिमा असलेला, अभ्यासू आणि २४ तास लोकांसाठी उपलब्ध असणारा नेता गमावल्याची भावना फोंड्यातील नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या निधनाने केवळ फोंडा मतदारसंघाचेच नव्हे, तर गोव्याच्या भावी नेतृत्वाचे मोठे नुकसान झाले आहे. एका उमद्या डॉक्टरचा आणि राजकारण्याचा असा अंत व्हावा, हे गोमंतकीयांच्या मनाला चटका लावून जाणारे आहे.


PMC Polls: Despite BJP's heavy weight leaders, Ketan Bhatikar's Rising  Ponda gave tough fight - Goemkarponn - Goa News

हेही वाचा