काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचे निधन

Story: प्रतिनिधी| गोवन वार्ता |
2 hours ago
काँग्रेस नेते डॉ. केतन भाटीकर यांचे निधन

रद्द झालेल्या फोंडा पोटनिवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार राहिलेले डॉ. केतन भाटीकर यांचे निधन झाले. प्रवासादरम्यान अनमोड घाटात थांबलेल्या ठिकाणी त्यांना सर्पदंश झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

पहाटे ३.३२ वाजता त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून धारबांदोडा आरोग्य केंद्रात आणण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

त्यांच्या पायावर जखम आढळून आली असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे डॉक्टरांनी सांगितले. आरोग्य केंद्राने या घटनेची माहिती कुळे पोलीस स्थानकाला दिली आहे.

४१ वर्षीय डॉ. केतन किर्तीकुमार भाटीकर हे व्यवसायाने फिजिओथेरपिस्ट होते. फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर आज सुनावणी होणार होती.

डॉ. भाटीकर निवडणूक जिंकतील, असे अंदाज व्यक्त होत असतानाच उच्च न्यायालयाने निवडणूक रद्द केली होती. त्या घटनेनंतर ते प्रचंड तणावाखाली असल्याचे बोलले जात होते.

प्रवासादरम्यान वाटेत थांबलेल्या ठिकाणी त्यांना सर्पदंश झाला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत असून शवविच्छेदनानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

हेही वाचा