पक्ष असो वा कुटुंब, घरातली घाणेरडी धुणी व खरकटी भांडी ही चार भिंतींच्या आतच धुवायची असतात, याचे भान नसले की पक्ष असो वा कुटुंब, घरात 'रिव्होल्युशन' हे होणारच हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले.

सुमारे २०१९च्या आसपास गोव्यात एक चळवळ सुरू झाली. या चळवळीचे नेतृत्व सळसळत्या रक्ताच्या तरुण गोवेकराच्या हातात होते. आधी ही चळवळ फक्त आणि फक्त चळवळ म्हणून असेल असे सांगितले जात असताना कालांतराने त्या चळवळीचे अत्यंत स्वाभाविकपणे एका राजकीय पक्षात रूपांतर झाले. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, युनायटेड गोवन्स पार्टी, असे गोव्याची प्रादेशिक, राजकीय व सामाजिक भाषा बोलणारे पक्ष या गोव्याच्या मातीत निपजले, रुजले, वाढले व नष्ट झाले किंवा नावापुरते उरलेही. पण या सर्वांहून वेगळी अशी राजकीय मांडणी असलेला पक्ष म्हणून आरजी पक्ष पुढे आला होता. त्याची राजकीय मांडणी आणि राजकीय प्रभाव वेगळा होता, हे २०२२च्या निवडणुकीने सिद्ध केले. हा पक्ष मनोज ऊर्फ तुकाराम परब, वीरेश बोरकर आणि विश्वेश नाईक अशा होतकरू आणि उमद्या तरुणांनी एकत्र येऊन स्थापन केला; तो पक्ष म्हणजे रिव्होल्युशनरी गोवन्स पार्टी.
गोवा, भारताबाहेर आखाती देश तसेच ब्रिटन आणि इतर पाश्चात्य देशांमध्ये पोटासाठी नोकरी करणारे, पण गोव्याप्रती प्रचंड जिव्हाळा असलेले मूळ गोमंतकीय या पक्षाच्या राजकीय मांडणीकडे आकर्षित होऊन त्यांनी या पक्षाकडे आपल्या पदरच्या पैशांनी देणगीचा ओघ सुरू केला.
या पक्षाचा फॅनबेस हा मुख्यतः उपरोल्लेखित देशांमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. या पक्षाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्वच नेते, सदस्य आणि कार्यकर्ते हे पस्तीस आणि तिशीच्या आतले आहेत. मुख्य म्हणजे हाताला नोकरी नाही, आहे त्या नोकऱ्या परप्रांतीयांच्या घशात जातायत, पारंपरिक आणि आधुनिक व्यवसायात परप्रांतीयांनी घुसखोरी केली आहे. गोवेकराला गोव्यात घर घेणे दुरापास्त होऊन बसलेय, हे वास्तव या पक्षाने इतके अधोरेखित केले की पाहता पाहता हा पक्ष काँग्रेसच्या पारंपरिक अल्पसंख्याक ख्रिश्चन मतपेढीला आपल्याकडे आकर्षित करू लागला. मुळात आप आणि आरजी हे दोन पक्ष गोव्यात रुजले ते कॉंग्रेसला पर्याय म्हणून आणि या रुजण्याने काँग्रेस २०२२च्या निवडणुकीत जवळपास उखडली गेली. गोव्यात अल्पसंख्याक हा काँग्रेसचा मूळ आधार आणि काँग्रेस ही अल्पसंख्यांकांचा पहिला व शेवटचा तारणहार आहे, हे सत्य नाकारता येणार नाही. तर काँग्रेसची ही मतपेढी फोडण्याचे जिकिरीचे काम आरजीच्या युवाहस्ते पार पडले, यात दुमत नाही. पण अल्पसंख्याक, तसेच गोव्यातील तरुण ज्यांच्या हाताला काम नाही, असलेच तर उद्याची शाश्वती नाही, उलटपक्षी परप्रांतीय नोकऱ्या, धंदे आणि अधिकार हिरावून घेत आहेत, ही भावना प्रबळ झालेला युवक कोणत्याही पैशाची, लाभाची, पदाची अपेक्षा किंवा लालसा न बाळगता आरजीच्या मागे आला, ही गोव्याच्या राजकारणातील अद्भूत व असाधारण घटना म्हणावी लागेल.
आज आरजी या गोव्याच्या ताज्या व उमद्या प्रादेशिक पक्षामध्ये अंतर्गत धुसफूस सुरू झाली आहे. गेल्या फेब्रुवारीत नगर नियोजन कायद्यातील ३९/अ कलमाच्या विरोधात जे आधी नगरनियोजन खात्याच्या पणजी कार्यालयात, नंतर आझाद मैदानावर आणि नगरनियोजन मंत्री विश्वजित राणे यांच्या दोनापावल येथील बंगल्यावर आंदोलन झाले, त्या आंदोलनातून आरजीचे पहिले व एकमेव आमदार वीरेश बोरकर यांना न भूतो न भविष्यति असा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. प्रसारमाध्यमांचा प्रकाशझोत वीरेश यांच्यावरच राहिला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत जेव्हा वीरेश बोरकर व आंदोलनकर्त्यांना भेटायला आले होते, तेव्हा विश्वेश नाईक यांनी व्यक्त केलेली अस्पष्ट धुसफूस तसेच वीरेश बोरकर यांनी सुरू केलेले बेमुदत उपोषण जेव्हा संपवले, तेव्हा ते संपविताना पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांची अनुपस्थिती ही खटकणारी होती आणि येथूनच खरी ठिणगी पडली, यात वाद नाही.
यावेळी निवडून आलो नाही तर पक्षात आपला प्रभाव राहणार नाही, हे मनोज परब यांनी ताडले आहे. मनोज यांची कार्यपद्धती जरी सडेतोड, आक्रमक व बहुतांशी फटकळ असली तरीही त्याच्यामागे आरजीचे कार्यकर्ते आहेत, ही बाब दुर्लक्षून चालणार नाही. जेव्हा पक्ष वाढतो त्याचबरोबर त्या पक्षात हवशे, नवशे व गवशे वाढतात. आलेल्या, गेलेल्या व राहिलेल्या कार्यकर्त्यांच्या इच्छा, आकांक्षा व राजकीय महत्वाकांक्षा वाढत जातात. ३९/अ आंदोलनानंतर आपला जनाधार वाढला हे वीरेश बोरकर यांना कळून चुकले असणार आणि त्यातूनच वीरेश यांच्या हवा भरलेल्या शिडातून हवा काढून घेण्याचे प्रयत्न सुरू झाले, हेही तितकेच खरे.
पक्षाचे नेतृत्व कुणाकडे असावे व पक्ष कोण ताब्यात घेतो या सुंदोपसुंदीत आता पक्ष फुटतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गोव्याला एक सशक्त प्रादेशिक राजकीय पर्याय तयार झाला होता, त्याचाच 'फुटबॉल' होतो की काय अशी या पक्षाची वाताहत झाली आहे हे पक्षाध्यक्ष मनोज परब यांच्या समाजमाध्यमांवर धडाधड टाकलेल्या पोस्टवरून अनुमान काढता येते. स्वपक्षीय सदस्य जे वीरेश यांचे उघड उघड समर्थन करत आहेत त्यांना यातून लक्ष्य करण्यात आले तसेच त्यांना आव्हान देण्यात आले.
आरजी वाढला आणि पसरला तो मुळात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरला. जेव्हा मुख्य प्रवाहातील प्रसारमाध्यमे आरजीची म्हणावी तशी दखल घेत नव्हती, तेव्हा सोशल मीडियावर या पक्षाचे समर्थक पक्षाच्या कार्यक्रमांना भरपूर प्रतिसाद देत होते. हा पक्ष वाढला सोशल मीडियामुळे, पण आज त्याच सोशल मीडिया नावाच्या दुधारी तलवारीमुळे या पक्षात दोन शकले पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पक्षाध्यक्ष मनोज परब यांची मनातली ठसठस त्यांच्या पोस्टमधून बाहेर पडू लागली आहे. जेव्हा कोणत्याही पक्षप्रमुखाला किंवा मुख्यमंत्र्याला किंवा कोणत्याही राजकारण्याला पक्षांतर्गत विरोधक तयार होतात, तेव्हा हा विरोध अत्यंत थंडपणे मोडून काढायचा असतो. चारचौघात 'स्फुंदता हृदय हेचि' हा समाजमाध्यमी राग आळवणे आपली राजकीय अपरिपक्वता दर्शवते, याची जाणीव कोणताही पोक्त राजकारणी ठेवतो. तूर्तास वीरेश बोरकर यांनी शांतता राखून त्या पोक्तपणाचे योग्य प्रदर्शन केले, ही बाब लक्षात घ्यावी लागेल. परवाच्या कॉंग्रेसच्या पत्रकार परिषदेत वीरेश बोरकर कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार का, या चर्चेला आलेल्या प्रश्नाला कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी गालातल्या गालात हसून उत्तर देण्याचे टाळले, यातून भविष्यातील नवी राजकीय समीकरणे पुढे येतात की काय, ही शक्यता निर्माण झाली आहे.
पक्ष असो वा कुटुंब, घरातली घाणेरडी धुणी व खरकटी भांडी ही चार भिंतींच्या आतच धुवायची असतात, याचे भान नसले की पक्ष असो वा कुटुंब, घरात 'रिव्होल्युशन' हे होणारच हे यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले. या अपेक्षित असलेल्या क्रांतीतून हा केवळ सहा वर्षांचा पक्ष सावरेल व 'सेल्फगोल' न करता पुन्हा एकदा आपल्या विरोधकांवर 'गोल' करेल, अशी आशा व्यक्त करायला हरकत नाही. त्यातही आक्रस्ताळेपणा न करता, आदळआपट न करता परिणामांची शांतपणे वाट पाहणारे विवेकी असे 'बोरकरी' मौन तसे सूचक आहे, ही बाब गोमंतकीयांनी नजरेआड करू नये.
- प्रा. विघ्नेश शिरगुरकर
(लेखक कथालेखक, अनुवादक
आणि कवी आहेत.)