‘मन की बात’

देशाला ‘वर्क फ्रॉम होम’ची तयारी करावी लागेल. युद्ध आटोपले नाही तर गंभीर वेळ येणार आहे, त्यामुळे आतापासूनच ‘घरून काम’ संकल्पना राबवण्यास सुरुवात व्हायला हवी. सोने खरेदीवर नियंत्रण ठेवावे लागेल. जितक्या आवश्यक आहेत, तेवढ्याच गोष्टी कराव्यात, म्हणजे देशासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.

Story: संपादकीय |
11th May, 09:12 pm
‘मन की बात’

‘विंचवाचे बिऱ्हाड पाठीवर’ ही म्हण प्रचलित झाली. अर्थात त्या म्हणीचा अर्थ हा गरजेच्या सर्व गोष्टी पाठीवर म्हणजेच सोबत घेऊन फिरणे असा आहे. पुन्हा पुन्हा फेऱ्या मारण्याची गरज पडू नये म्हणून आवश्यक त्या गोष्टी सोबत घेऊन फिरण्याच्या पद्धतीला ती म्हण लागू झाली. तंतोतंत नाही, पण काहीसे तसे वागण्यासाठी देशाच्या प्रमुखांनी सध्या सर्वांना सुचवले आहे. कोविडच्या काळात सर्वांनी ‘वर्क फ्रॉम होम’ ही घरून काम करण्याची नवी पद्धत अवलंबली. अनेकांना त्याचा फायदा झाला. काही कंपन्यांना त्या काळात इतका फायदा झाला की कर्मचारी कार्यालयात न आले तर बऱ्याच गोष्टींची बचत होते, हे लक्षात आले. कोविडचा प्रसार मावळला. आजही मल्टीनॅशनल कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ याच तत्त्वावर काम दिले आहे. भारतातही हजारो कर्मचारी आज घराकडूनच काम पाहतात. मात्र ज्यांची कामावर उपस्थित राहण्याची गरज आहे, त्यांना पर्याय नाही. प्रत्यक्ष काम करण्यासाठी मनुष्यबळाची आवश्यकता असणे हा भाग वगळला तर जिथे कर्मचारी कुठूनही काम करू शकतो, त्यांना घरून काम करण्याची मुभा दिली जाते. हजारो लोक आजही घराकडून काम करतात. याचा फायदा अनेक पद्धतीने होतो. सर्वांत आधी कर्मचाऱ्याला एका जाग्यावरून किंवा एका राज्यातून, देशातून दुसऱ्या ठिकाणी बदली करण्याची आवश्यकता नाही. डिझेल, पेट्रोल, वेळेची बचत होते. कार्यालयातील वीज, इंटरनेट, तिथल्या सुविधांचीही बचत होते. सार्वजनिक वाहतूक, रस्त्यांवरील ताण कमी होतो. आरोग्याच्या समस्याही कमी निर्माण होतात अशा अनेक गोष्टींचा फायदा ‘वर्क फ्रॉम होम’ या संस्कृतीने करून दिला. कोविडच्या काळात देशात आलेली आणीबाणीची स्थिती सर्वांनी अनुभवली. पण त्या लाटेत अनेक उद्योग, व्यवसाय बंद पडले. नोकऱ्या गेल्या. आता कोविडसारखी आणीबाणीची स्थिती येऊ शकते, पण त्याचा आरोग्याशी संबंध नाही. 

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्ध थांबण्याचे नाव घेत नसल्यामुळे आखाती देशांतून येणारे पेट्रोल, डिझेल, गॅस या गोष्टी आता जास्त महाग होतील; त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला पुन्हा एकदा ‘वर्क फ्रॉम होम’चा पर्याय स्वीकारण्याचे आवाहन केले. युद्धाची झळ आणखी तीव्र होऊ शकते, याची जाणीव पंतप्रधान मोदींना झाली आहे. यापूर्वीही त्यांनी कोविडसारखी स्थिती उद्भवू शकते, असे संकेत दिले होते. पण हैदराबादच्या कार्यक्रमात त्यांनी याविषयी स्पष्टपणे मत व्यक्त केले. फक्त पेट्रोल-डिझेलचेच दर वाढतील म्हणून त्याचा वापर कमी करण्याचे सुचवले नाही, तर विदेशी चलन वाचवण्यासाठी वर्षभर सोने खरेदीही टाळा, असे त्यांनी आवाहन केले आहे. देशात लग्नाचा हंगाम सुरू आहे. अशा वेळी जनतेला त्यांनी घरच्या समारंभालाही सोने खरेदी करू नका, वर्षभर या गोष्टी पाळा. असा त्याग करणे हेही देशभक्तीचेच काम आहे, असे म्हटले आहे. मोदी यांच्या या विधानाला गांभीर्याने घेणारे अनेक ‘अनुयायी’ असल्यामुळे त्याचा परिणाम सोने खरेदीवर होऊ शकेल. सोन्याचे दरही काही प्रमाणात कमी झाले. मोदींनी तर खाद्यतेलाचा वापरही कमी करण्याचा सल्ला दिला आहे. गाड्यांचा वापर कमी करून मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा, कारने फिरत असाल तर इतरांनाही सोबत घ्या किंवा इलेक्ट्रिक वाहन असेल तर त्याचा वापर जास्त करा, हे सांगायला मोदी विसरलेले नाहीत. विदेश दौरेही टाळा, देशांतर्गत प्रवासावर भर द्या, असे मोदी यांनी म्हटले आहे. 

हैदराबादमध्ये विकास प्रकल्पांचे उद्घाटन करण्यासाठी आलेले मोदी खऱ्या अर्थाने ‘मन की बात’ करून आले आहेत. आपण जे बोललो ते देशहितासाठी करून पाहा, असे आवाहन त्यांनी जनतेला केल्यामुळे त्यांच्या या भाषणाचा परिणाम देशात दिसू शकतो. पंतप्रधान म्हणून मोदी यांनी ज्या गोष्टी सांगितल्या त्या अभ्यासाअंतीच असतील, त्यामुळे देशाला ‘वर्क फ्रॉम होम’ची तयारी करावी लागेल. युद्ध आटोपले नाही तर गंभीर वेळ येणार आहे, त्यामुळे आतापासूनच ‘घरून काम’ संकल्पना राबवण्यास सुरुवात व्हायला हवी. सोने खरेदीवर नियंत्रण ठेवावे लागेल. जितक्या आवश्यक आहेत, तेवढ्याच गोष्टी कराव्यात, म्हणजे देशासाठी बऱ्याच गोष्टी सोप्या होतील.