मिळाला एआयडीएमकेच्या बंडखोर आमदारांचा पाठिंबा; टीव्हीके सरकारच्या पारड्यात १४४ मते.

चेन्नई : तमिळनाडूच्या राजकारणात बुधवारी एक नवा इतिहास रचला गेला. अटीतटीच्या राजकीय घडामोडींनंतर 'तमिळगा वेत्री कळघम'चे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी विधानसभेत आपले बहुमत सिद्ध केले आहे. २३४ सदस्यीय विधानसभेत बहुमतासाठी ११८ मतांची आवश्यकता असताना, विजय यांच्या सरकारच्या बाजूने १४४ आमदारांनी मतदान केले. तमिळनाडूच्या इतिहासात पहिल्यांदाच या विश्वासदर्शक ठरावाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.
अशी जुळली गणिते
निवडणुकीत १०८ जागा जिंकणाऱ्या टीव्हीके पक्षाला काँग्रेस (५), सीपीआय (२), सीपीआय-एम (२), व्हीसीके (२) आणि आययुएमएल (२) या पक्षांनी पाठिंबा दिला होता. मतदानापूर्वी टीव्हीकेचे संख्याबळ १०७ होते (मुख्यमंत्री विजय यांनी तिरुचिरापल्ली पूर्व जागा सोडल्यामुळे). मात्र, अण्णा द्रमुकमध्ये पडलेल्या फुटीचा फायदा मुख्यमंत्री विजय यांना झाला. अण्णा द्रमुकच्या ४७ पैकी ३० आमदारांनी व्ही. सी. षण्मुगम आणि एस. पी. वेलुमणी यांच्या नेतृत्वाखाली विजय यांना पाठिंबा दर्शवला. अंतिम आकडेवारीनुसार, अण्णा द्रमुकच्या किमान २४ आमदारांनी सरकारच्या बाजूने मतदान केले.
विश्वासदर्शक ठरावावेळी सभागृहात प्रचंड गदारोळ पाहायला मिळाला. ५९ आमदार असलेल्या प्रमुख विरोधी पक्ष द्रमुकने मतदानावर बहिष्कार टाकत सभात्याग केला. उदयनिधी स्टॅलिन यांनी टीका करताना म्हटले की, सरकारने पहिल्याच दिवशी जनतेचा विश्वास गमावला असून हा सत्तेचा बदल नसून केवळ देवाणघेवाण आहे. अण्णा द्रमुकचे नेते एडप्पाडी पलानीस्वामी यांनी आपल्या आमदारांना 'व्हिप' बजावून विरोधात मतदान करण्याचे आदेश दिले होते, तसेच आमदारांना पैशांचे आमिष दाखवण्यात आल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केला.
मद्रास उच्च न्यायालयाने टीव्हीकेचे आमदार श्रीनिवास सेतुपथी यांना मतदानापासून रोखले होते, तरीही आमदारांच्या मदतीने मुख्यमंत्री विजय यांनी बहुमताचा टप्पा सहज पार केला. यामुळे तमिळनाडूत आता अभिनेता ते राजकारणी बनलेल्या विजय यांच्या नेतृत्वाखालील स्थिर सरकारचा मार्ग मोकळा झाला आहे.