गावातील मुलांच्या भन्नाट ‘जुगाड कार’ने सचिन तेंडुलकर प्रभावीत

थांबून कौतुक करत म्हणाले; “फक्त संधी मिळायला हवी!” : व्हिडीओ प्रचंड व्हायरल

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
12th May, 11:41 am
गावातील मुलांच्या भन्नाट ‘जुगाड कार’ने सचिन तेंडुलकर प्रभावीत

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू तथा भारतरत्न सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांना एका ग्रामीण भागातील मुलांच्या कल्पकतेने अक्षरशः थक्क केले. रोड ट्रिपदरम्यान गावातील काही मुले स्वतः तयार केलेल्या ‘जुगाड कार’सह (car-like cart)  रस्त्यावरून जाताना दिसताच सचिन यांनी आपली गाडी थांबवून त्यांच्या या अनोख्या कल्पनेचे कौतुक केले.

या मुलांनी उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून लाकडी आधार, चाके आणि लोखंडी रॉडच्या मदतीने छोटेखानी कारसदृश गाडी तयार केली होती. एक मुलगा त्या गाडीत बसून तर इतर मुले ती पुढे ढकलत आणि ओढत नेत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसून आले. साध्या स्वरूपातील ही कल्पक रचना पाहून सचिन तेंडुलकर प्रभावित झाले आणि त्यांनी मुलांशी संवाद साधत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले. 

सचिन यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) शेअर करत लिहिले की, “भारताच्या एका दुर्गम भागातून प्रवास करत असताना आम्ही अशा ‘कार’ला पाहिले, जी कोणत्याही शोरूममधून नव्हे तर कल्पकतेतून तयार झाली होती. अशी प्रतिभा परिपूर्ण परिस्थितीची वाट पाहत नाही, ती स्वतःच मार्ग शोधते. ‘‘बस मौका मिलना चाहिए!”

सचिन यांच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर (online) मुलांच्या या अनोख्या कारचे फोटो आणि व्हिडीओ  (video) मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून; युवकाच्या कल्पकतेचे कौतुक केले जात आहे.


हेही वाचा