सनातनविरोधी वक्तव्याने उदयनिधी पुन्हा चर्चेत

तमिळनाडू विधानसभेत ‘सनातन संपवले पाहिजे’; राज्यगीतावरूनही ‍टीका

Story: न्यूज डेस्क । गाेवन वार्ता |
12th May, 08:13 pm
सनातनविरोधी वक्तव्याने उदयनिधी पुन्हा चर्चेत

चेन्नई : उदयनिधी स्टॅलिन यांनी मंगळवारी तामिळनाडू विधानसभेच्या अधिवेशनात भाषण करताना पुन्हा एकदा ‘सनातन विरोधी’ मुद्दा उपस्थित केला. समाजात भेद निर्माण करणाऱ्या सनातन व्यवस्थेचा अंत झाला पाहिजे, अशी मागणी त्यांनी पुन्हा केली.भाषणादरम्यान स्टॅलिन म्हणाले, लोकांमध्ये भेद निर्माण करणारे सनातन संपवले गेले पाहिजे. त्यांच्या या वक्तव्यावेळी मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय सभागृहात उपस्थित होते. उदयनिधी स्टॅलिन यांनी यापूर्वी २०२३ मध्येही अशाच प्रकारचे वक्तव्य केले होते. त्यानंतर देशभरात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता.उदयनिधी स्टॅलिन यांनी विधानसभेत राज्यगीताच्या मुद्द्यावरूनही सरकारवर टीका केली. ते म्हणाले, सोमवारी मुख्यमंत्र्यांना आमचे नेते आणि इतर अनेक नेत्यांकडून शुभेच्छा देण्यात आल्या. हे राजकीय सौजन्य या सभागृहातही कायम राहिले पाहिजे. आपण सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर वेगवेगळे बसलो असलो, तरी तमिळनाडूच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र काम केले पाहिजे.
उदयनिधी स्टॅलिन यांनी मुख्यमंत्री आणि आपण एकाच महाविद्यालयात शिक्षण घेतल्याचा उल्लेख करत म्हटले, आम्ही आमचे अनुभव आणि ज्ञान सामायिक करू इच्छितो. मुख्यमंत्र्यांनी आमच्या सूचनांचाही स्वीकार केला पाहिजे.
‘वंदे मातरम्’, तमिळनाडू राज्यगीतावर टीका
विरोधी पक्षांनी ‘वंदे मातरम्’नंतर तमिळनाडूचे राज्यगीत वाजविण्यात आल्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी समारंभात ‘वंदे मातरम्’ वाजविण्यात आले नव्हते, मात्र येथे ते वाजवण्यात आले. तेथील राज्यपाल कोण आहेत, हे सर्वांना माहिती आहे. सरकारने पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ देऊ नये. तमिळनाडूच्या राज्यगीताला कधीही दुय्यम स्थान दिले जाऊ नये, असेही उदयनिधी स्टॅलिन म्हणाले.      

हेही वाचा