चोर्ला घाटात कार २० फूट खोल दरीत कोसळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
just now
चोर्ला घाटात कार २० फूट खोल दरीत कोसळून खाक; सुदैवाने जीवितहानी टळली

बेळगाव: चोर्ला घाट परिसरात सोमवारी मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. गोव्याहून बेळगावकडे येणारी एमएच-१०-सीएन-८४७७ क्रमांकाची कार एका धोकादायक वळणावरून सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली. यानंतर कारने पेट घेतल्याने ती पूर्णतः जळून खाक झाली. ही घटना काल मंगळवारी सकाळी प्रवाशांच्या निदर्शनास आली.

कणकुंबी-चोर्ला मार्गावर असलेल्या तीव्र चढाव आणि वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे. रात्रीच्या वेळी चालकाला डुलकी लागली असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. नियंत्रण सुटताच कार थेट रस्त्यालगतच्या खोल दरीत जाऊन पडली आणि त्यानंतर तिला भीषण आग लागली.

मंगळवारी सकाळी काही प्रवाशांनी ही जळालेली कार पाहून घटनेची माहिती दिली. मात्र, गाडीत नेमके कोण होते, वाहन कोठून निघाले होते आणि अपघातावेळी किती जण प्रवास करत होते, याबाबत अद्याप स्पष्टता झालेली नाही. घटनास्थळी कोणतीही व्यक्ती आढळली नसल्याने, अपघातानंतर चालक किंवा प्रवाशांनी तेथून सुरक्षित बाहेर पडून अन्य वाहनाने प्रस्थान केले असावे, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

हेही वाचा