आरोशी समुद्रकिनाऱ्यावर बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पर्यटकाविरोधात गुन्हा

वेर्णा पोलिसांची कारवाई

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
just now
आरोशी समुद्रकिनाऱ्यावर बेदरकार वाहन चालवल्याप्रकरणी महाराष्ट्रातील पर्यटकाविरोधात गुन्हा

वास्को : गोव्यातील (Goa) आरोशी समुद्रकिनाऱ्यावर (Arrosim beach)  बेदरकारपणे वाहन चालवून पर्यटकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी वेर्णा पोलिसांनी महाराष्ट्रातील (Maharashtra) एका पर्यटकाविरोधात गुन्हा नोंद केला आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी सायंकाळी सुमारे ५.१५ वाजण्याच्या सुमारास आरोशी किनाऱ्यावर ही घटना घडली. राशिदबेग सादिकबेग इनामदार (वय २६, रा. इचलकरंजी, कोल्हापूर, महाराष्ट्र) असे संबंधित पर्यटकाचे नाव आहे. समुद्रकिनाऱ्यावर अतिशय बेदरकार आणि निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांच्या जीवास धोका निर्माण केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.  

या प्रकारामुळे किनाऱ्यावर उपस्थित पर्यटक आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. संबंधित वाहनचालकाच्या कृत्यामुळे मानवी जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून, कोणतीही दुर्घटना घडण्याची शक्यता होती; असे पोलिसांचे म्हणणे आहे. 

या प्रकरणी प्राप्त तक्रारीच्या आधारे वेर्णा पोलिसांनी (Verna Police)  गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिकारी गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या देखरेखीखाली उपनिरीक्षक कॅरी फर्नांडिस अधिक तपास करीत आहेत. 

हेही वाचा