पंचायतीत घटनात्मक पेच : आंदोलक महिलांच्या दबावापुढे उपसरपंचांची शरणागती

डिचोली : कारापूर-सर्वण येथील बहुचर्चित मेगा गृहनिर्माण प्रकल्पाविरोधातील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे. मंगळवारी पंचायतीत झालेल्या गोंधळानंतर प्रकल्पाला ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याऐवजी उपसरपंच बीबी आयेशा मागोड यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. सरपंचपद रिक्त असताना आता उपसरपंचांनीही पदत्याग केल्यामुळे पंचायतीवर प्रशासक नेमण्याची पाळी आली आहे.
गेल्या ३८ दिवसांपासून कारापूर येथील महिला ग्रामदेवी शांतादुर्गा मंदिरासमोर धरणे आंदोलन करत आहेत. १९ एप्रिलच्या ग्रामसभेत या प्रकल्पाविरोधात पाच ठराव मंजूर झाले होते. या ठरावांची अंमलबजावणी करण्यासाठी आणि प्रकल्पाला ‘काम बंद’ करण्याची नोटीस बजावण्यासाठी आंदोलकांनी मंगळवारी पंचायत कार्यालयावर धडक दिली.
अनेक दिवसांच्या अनुपस्थितीनंतर उपसरपंच बीबी आयेशा मागोड कार्यालयात आल्या असता, आंदोलक महिलांनी त्यांना धारेवर धरले. सचिव महादेव नाईक यांनी उपसरपंच नोटीस बजावू शकतात, असे स्पष्ट करूनही मागोड यांनी कायदेशीर सल्ल्याचे कारण पुढे करत वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ‘नोटीस द्या, अन्यथा राजीनामा द्या’ अशी मागणी लावून धरली. अखेर पोलिसांच्या उपस्थितीत उपसरपंचांनी आपल्या पदाचा राजीनामा सादर केला.
पंचायत मंडळावर भ्रष्टाचाराचे आरोप
या घडामोडींनंतर समाज कार्यकर्ते सिद्धेश तारी यांनी पंचायत मंडळावर गंभीर आरोप केले. प्रकल्पासाठी गावाला उद्ध्वस्त करण्याची सुपारीच पंचायत मंडळाने घेतली आहे. भ्रष्टाचारात अडकलेले पंच नोटीस बजावण्याऐवजी पद सोडण्यास प्राधान्य देत आहेत, हे दुर्दैवी आहे, अशी टीका त्यांनी केली.
आंदोलन आता राज्यव्यापी
या आंदोलनाला आता ‘इनफ इज इनफ’ चळवळीसह राज्यातील विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळत आहे. अॅड. अजय प्रभुगावकर, स्वप्नेश शेर्लेकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनीही ग्रामस्थांच्या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. लोढा प्रकल्प हद्दपार करेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार कारापूरवासीयांनी व्यक्त केला आहे.