पाच बांगलादेशी दरोडेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

दोनापावला, म्हापशातील बंगल्यांवर सशस्त्र दरोड्यांत सहभाग

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
11th May, 11:55 pm
पाच बांगलादेशी दरोडेखोरांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

पणजी : दोनापावला आणि म्हापसा येथील बंगल्यांवर सशस्त्र दरोडे टाकून लाखो रुपयांचा ऐवज पळवणाऱ्या बांगलादेशी टोळीतील पाच अट्टल दरोडेखोरांना सोमवारी मेरशी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने (क्राईम ब्रांच) या संशयितांना दिल्लीतून ताब्यात घेऊन गोव्यात आणले होते.
या टोळीने २० एप्रिल रोजी दोनापावला येथील एका बंगल्यात घरमालकांना बाथरूममध्ये कोंडून एक किलो सोने आणि ३ लाख रुपयांची लूट केली होती. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी म्हापसा हाऊसिंग बोर्ड परिसरात ३५ लाखांचा ऐवज लुटून तक्रारदाराची कार घेऊन ते पसार झाले होते. या दोन्ही घटनांमुळे गोव्यात खळबळ उडाली होती.
या गुन्ह्यांनंतर गोवा पोलीस या टोळीच्या मागावर होते. दरम्यान, १४ आणि १५ एप्रिलच्या मध्यरात्री दिल्लीतील सराय काले खान स्मशानभूमीजवळील जंगलात ही टोळी एका नवीन दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या परिसराला वेढा घातला असता, दरोडेखोरांनी गोळीबार सुरू केला. पोलिसांनी चोख प्रत्युत्तर देत सहा दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
पाच संशयितांची कोठडीत रवानगी
दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्यांपैकी नूर आलम ऊर्फ नादिम खान, मो. सैफूल इस्लाम, सोहेल खान, जाकिर हवलादार आणि मो. सुमन हवलादार ऊर्फ पप्पू या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने गोव्यात आणले होते. सुरुवातीला न्यायालयाने त्यांना ११ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. ही मुदत संपल्यानंतर सोमवारी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांची रवानगी १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तगुरु सावंत करत आहेत.

हेही वाचा