दामू नाईक : निवडणुकीसाठी भाजप नेहमीच तयार

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : ‘एसआयआर’ (मतदार याद्यांची विशेष आणि सखोल फेरतपासणी) प्रक्रियेमुळे राज्यातील नगरपालिका निवडणुकीला विलंब झाला आहे. सध्या मतदारांची संख्या कमी झाल्यामुळे प्रभागांची पुनर्रचना करावी लागणार आहे. ही पुनर्रचना व्यवस्थित व्हावी यासाठी निवडणुकीला उशीर होत आहे. निवडणूक कधीही होवो, भाजप नेहमीच तयार असतो, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी केले.
राज्यातील बहुतेक नगरपालिकांचा कार्यकाळ मे महिन्यात संपला आहे. मात्र, सरकारने एक अध्यादेश जारी करून नगरपालिकांसह राज्य पातळीवरील सर्व निवडणुका घेण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाला दिले आहेत. त्यामुळे प्रभाग पुनर्रचनेसाठी आयोगाला वेळ हवा असल्याने निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.
दामू नाईक पुढे म्हणाले की, निवडणूक वेळेवर व्हावी अशी सर्वांचीच इच्छा आहे. मात्र मध्यंतरी अचानक ‘एसआयआर’ झाल्याने मतदार कमी झाले आणि त्यामुळे प्रभागांची रचना बदलली आहे. आता लोकसंख्येनुसार प्रभागांची पुनर्रचना करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचा सरकार प्रयत्न करत आहे.
निवडणुका लवकर होवोत किंवा उशिरा, भाजप नेहमीच सज्ज असतो. प्रदेशाध्यक्ष म्हणून माझे काम संघटना मजबूत ठेवणे आणि कार्यकर्त्यांना तयार करणे हे आहे.
- दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष