तामिळनाडूत दर दोन महिन्याला मिळणार २०० युनिट वीज मोफत

शपथग्रहणानंतर मुख्यमंत्री विजय यांची घरगुती वीज ग्राहकांना पहिली भेट


13 hours ago
तामिळनाडूत दर दोन महिन्याला मिळणार २०० युनिट वीज मोफत

सी. विजय जोसेफ यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ देताना राज्यपाल राजेंद्र आर्लेकर.

न्यूज डेस्क। गोवन वार्ता
चेन्नई : थलपती विजय जोसेफ यांनी रविवारी येथील नेहरू इनडोअर स्टेडियममध्ये मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथविधी सोहळ्यानंतर लगेचच मुख्यमंत्री विजय यांनी तीन महत्त्वाच्या फाईल्सवर स्वाक्षरी केली. याद्वारे, घरगुती ग्राहकांना दर दोन महिन्याला २०० युनिट्सपर्यंत मोफत वीज पुरवण्यास आणि महिलांच्या सुरक्षेसाठी समर्पित विशेष दलाची स्थापना करण्यास त्यांनी मंजुरी दिली.
मुख्यमंत्र्यांची घोषणा घरगुती वीज ग्राहकांसाठी सर्वात मोठी भेट ठरली आहे. ज्या ग्राहकांचा दोन महिन्यांचा वीज वापर ५०० युनिट किंवा त्यापेक्षा कमी आहे, त्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. पूर्वी ही सवलत केवळ १०० युनिटपर्यंत मर्यादित होती. आता विजय सरकारने ती दुप्पट केली आहे. ज्यांचे वीज बिल ५०० युनिटपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी मात्र जुनीच योजना लागू राहणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीनेही विजय यांनी दोन महत्त्वाचे आदेश काढले. यामध्ये राज्यातील ड्रग्जचे जाळे मुळापासून उखडून टाकण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात विशेष पथकाची नियुक्ती केली आहे. तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा दल स्थापन केले आहे.
दरम्यान, विरोधी पक्षाने या निर्णयांचे स्वागत केले असले तरी, राज्याच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वीज कंपन्या आधीच तोट्यात असताना ही सवलत कशी दिली जाईल, असा सवाल काही नेत्यांनी केला आहे.
तामिळनाडूत ‘विजय पर्वा’ला प्रारंभ
टीव्हीकेचे अध्यक्ष आणि अभिनेते सी. जोसेफ विजय यांनी रविवारी तामिळनाडूचे नववे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पदाची शपथ दिली. या सोहळ्याला लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित होते. वियज यांच्यासोबत टीव्हीकेमधील नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी त्यांना १३ मेपर्यंत विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत.
विजयकडून प्रोटोकॉलचे उल्लंघन
तामिळनाडूचे नवीन मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी त्यांच्या शपथविधी समारंभादरम्यान भाषण सुरू करून राजशिष्टाचाराचे (प्रोटोकॉलचे) उल्लंघन केले. जोसेफ विजय शपथ घेतानाच भाषण देऊ लागले. यावेळी विजय यांना थांबवण्यासाठी राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी हस्तक्षेप केला आणि आधी शपथविधीची औपचारिक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले. विजय शपथ घेण्यासाठी व्यासपीठावर आले, तेव्हा त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड उत्साह होता. खुद्द विजयही अत्यंत जोशात होते. उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून नकळतपणे चूक घडली. चूक लक्षात येताच विजय यांनी तात्काळ आपले भाषण थांबवले आणि आपली शपथ पूर्ण केली.

हेही वाचा