तामिळनाडूतील पेच अखेर सुटला; विजय होणार मुख्यमंत्री

आज शपथविधी : ११८ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र सादर


08th May, 11:47 pm
तामिळनाडूतील पेच अखेर सुटला; विजय होणार मुख्यमंत्री

सरकार स्थापनेचे निमंत्रण मिळाल्यावर राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचा सत्कार करताना टीव्हीकेचे नेते विजय. सोबत इतर.
न्यूज डेस्क। गोवन वार्ता
चेन्नई : तामिळनाडूमध्ये सरकार स्थापनेसंदर्भातील राजकीय उत्सुकता अखेर शुक्रवारी रात्री संपली. टीव्हीकेचे प्रमुख आणि अभिनेते विजय मुख्यमंत्री होणार हे निश्चित झाले आहे. शुक्रवारी विजय यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना ११८ सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यासाठी विजय यांना निमंत्रित केले.
शुक्रवारी लोकभवनात विजय यांनी सलग तिसऱ्या दिवशी राज्यपालांची भेट घेतली. सरकार स्थापन करण्याचा आपला दावा ठामपणे मांडला. त्यांनी टीव्हीके, काँग्रेस, सीपीआय, सीपीआय (एम) आणि व्हीसीके पक्षांच्या एकूण ११८ आमदारांची पाठिंब्याची पत्रे सादर केली. विधानसभा निवडणुकीत टीव्हीकेने २३४ पैकी १०८ जागा जिंकल्या होत्या. यापैकी दोन जागा विजय यांनी जिंकल्या. त्यांना एक जागा सोडावी लागेल. परिणामी आमदारांची एकूण संख्या १०७ झाली आहे. काँग्रेसच्या पाच आणि सीपीआय, सीपीआय(एम) व व्हीसीकेच्या प्रत्येकी दोन आमदारांच्या पाठिंब्याने टीव्हीकेने बहुमत मिळवले आहे.
यापूर्वी, विजयने ६ आणि ७ मे रोजी सरकार स्थापन करण्याचा दावा केला होता; मात्र, ११८ आमदारांच्या पाठिंब्याशिवाय सरकार स्थापन करण्यासाठी आमंत्रित करता येणार नाही, असे राज्यपालांनी त्यांना सांगितले होते. शनिवारचा दिवस तामिळनाडूसाठी ऐतिहासिक असेल. शुक्रवारी लोकभवनात झालेल्या बैठकीनंतर शपथविधी सोहळ्याच्या घडामोडींना वेग आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि नेते राहुल गांधी शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सरकारकडे १२० आमदारांचे संख्याबळ
विधानसभा निवडणुकीत १०८ जागा जिंकून टीव्हीके सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास आला. सरकार स्थापन करण्यासाठी ११८ जागांचा पाठिंबा आवश्यक आहे. काँग्रेसने आधीच विजय यांना पाठिंबा दर्शवला होता. यानंतर सीपीआय, सीपीआय(एम) आणि व्हीसीके या पक्षांच्या प्रत्येकी दोन आमदारांनी विजय यांच्या टीव्हीकेला पाठिंबा दर्शवला. त्यामुळे बहुमत गाठणे शक्य झाले. विशेष म्हणजे, काँग्रेस, व्हीसीके, सीपीआय आणि सीपीआय (एम) हे सर्व पक्ष पूर्वी डीएमकेचे मित्रपक्ष होते. टीव्हीकेला दोन जागा असलेल्या इंडियन युनियन मुस्लिम लीगनेही पाठिंबा दिला आहे. त्यामुळे सरकारकडे १२० आमदारांचे संख्याबळ असणार आहे.
मुख्यमंत्री म्हणून विजयसमोर मोठी आव्हाने
राजकीय तज्ज्ञांच्या मते, विजय याच्यापुढील सर्वांत मोठे आव्हान त्यांनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरवणे हे असेल. जनतेला रोजगार, सुधारित शिक्षण, सुधारित आरोग्यसेवा आणि वाढीव गुंतवणूक यांसारख्या मोठ्या अपेक्षा आहेत. विजय यांचे सरकार तामिळनाडूमध्ये एक नवीन राजकीय संस्कृती आणि एक नवीन प्रशासकीय प्रारूप आणू शकते.