दत्तगड-बेतोडा परिसरात डेंग्यूचे संशयित

वाढत्या रुग्णांमुळे चिंता : साठवलेल्या पाण्यामुळे धोका

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 09:53 pm
दत्तगड-बेतोडा परिसरात डेंग्यूचे संशयित

फोंडा : दत्तगड-बेतोडा परिसरात गेल्या काही दिवसांत एकूण १० संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळून आले आहेत. पाण्याची टंचाई असल्याने नागरिकांनी पर्यायी व्यवस्था म्हणून उघड्या भांड्यांत पाणी साठवून ठेवले आहे. यामुळे डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे याबाबत सातत्याने जनजागृती केली जात आहे. दत्तगड भागात मोठ्या संख्येने लोकवस्ती असून अनेक घरांमध्ये कामगार वर्ग भाड्याच्या खोलीत राहतो. नळातून पाणीपुरवठा सुरळीत होत नसल्यामुळे नागरिकांना पैसे खर्च करून टँकरचे पाणी खरेदी करावे लागते.

पाणीटंचाईमुळे उघड्यावर साठवलेले पाणी ठरतेय डेंग्यूसाठी कारणीभूत

खरेदी केलेले पाणी भांड्यांत व्यवस्थित झाकून न ठेवल्यामुळे संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण सापडण्याच्या घटना घडत आहेत. याच भागात चार वर्षांपूर्वी १५ पेक्षा अधिक रुग्ण सापडले होते. फोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे जनजागृती करण्यात आली असली, तरी लोक सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करीत नसल्याचे दिसून येते. आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर, स्वच्छता विभागाचे निरीक्षक मनोज नाईक व अन्य कर्मचारी गेल्या काही महिन्यांपासून परिसरात लक्ष ठेवून आहेत. पण नळातून सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने दत्तगड भागात दरवर्षी पाण्यासाठी लोकांची मोठी तारांबळ उडते.

आरोग्य खात्याच्या जनजागृती मोहिमेला नागरिकांच्या असहकार्याचा फटका

सध्या दत्तगड भागात एकूण ४ नवीन संशयास्पद डेंग्यूचे रुग्ण आढळले आहेत. माहिती मिळाल्यानंतर आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांनी त्वरित परिसरात जाऊन औषधाची फवारणी केली आहे. तसेच स्थानिक लोकांना पुन्हा जागरूक करण्यात कर्मचारी व्यस्त आहेत. परंतु टँकरमधून विकत आणलेले आणि साठवलेले पाणी ओतणार नाही, असे रोखठोक उत्तर बेतोडातील नागरिक आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांना देत आहेत. यामुळे पाणी रिकामे करताना कर्मचाऱ्यांसोबत नागरिकांचे वाद होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

साठवलेले पाणी ओतण्यावरून आरोग्य कर्मचारी आणि रहिवाशांमध्ये खटके

परिसरातील पाण्याची समस्या दरवर्षी वाढत असून लोकवस्ती वाढत असल्यामुळे स्थानिक लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अनेक लोक टँकरचे पाणी परिसरात साठवून ठेवतात, त्यामुळे डेंग्यूचा प्रसार होत आहे. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य खाते प्रयत्नशील असून दत्तगड भागात डेंग्यूबाबत जागृती करण्यावर भर दिला जात आहे. अनेक घरांच्या समोर पाणी साठवून ठेवण्यात आल्याने आतापर्यंत १० संशयास्पद रुग्ण आढळले आहेत, असे आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता पार्सेकर यांनी स्पष्ट केले.

दत्तगड भागात डेंग्यू रोखण्यासाठी आरोग्य अधिकाऱ्यांचे विशेष प्रयत्न सुरू

#PondaNews #DengueAlert #GoaHealthDepartment #Betoda #WaterScarcity #HealthAwareness #BreakingNewsGoa #MarathiNews
हेही वाचा