एका विद्यमान मंत्र्याला मिळणार डच्चू : मंत्रिमंडळ फेररचनेविषयी दिल्लीत चर्चा

पणजी : राज्य मंत्रिमंडळाच्या फेररचनेच्या चर्चेला पुन्हा उधाण आले आहे. या फेरबदलात राज्यात दोन नव्या आमदारांची मंत्रिपदी वर्णी लागण्याची शक्यता असून, एका विद्यमान मंत्र्याला डच्चू दिला जाण्याची दाट शक्यता आहे. यासाठी एका महिला आमदारासह दोघांना मंत्रिपद मिळू शकते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. या भेटीवेळी मंत्रिमंडळ फेररचनेविषयी चर्चा झाली असून, दोन आमदारांना मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे, असे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. तसेच, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आणि पक्षसंघटन अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली भेटीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला गती
दिवंगत नेते आणि फोंड्याचे माजी आमदार रवी नाईक यांच्या निधनानंतर एक मंत्रिपद रिक्त आहे. या रिक्त मंत्रिपदावर एका आमदाराची वर्णी लागण्याची शक्यता आहे. तसेच, आणखी एका मंत्र्याला डच्चू देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून, या पदावर एका नवीन आमदाराला संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. शिवोलीच्या आमदार डिलायला लोबो या नवनिर्वाचित आमदार आहेत. त्यांनी आपली पहिली निवडणूक २०२२ साली शिवोली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर लढवून भाजपच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला होता. त्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. सध्या त्या गोवा मनोरंजन संस्थेच्या उपाध्यक्षा असून त्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची दाट शक्यता आहे.
रवी नाईक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर नवीन चेहऱ्याला संधी
नीलेश काब्राल यांनी यापूर्वी भाजप सरकारात पर्यावरण आणि वीज मंत्री म्हणून पदभार सांभाळलेला आहे. नुवेचे आमदार आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी काब्राल यांनी आपल्या मंत्रिपदाचा त्याग केला होता. त्यांच्या या त्यागाचे फळ पुन्हा मंत्रिपदाच्या रूपाने देण्याचा निर्णय पक्ष घेण्याची शक्यता आहे. अनुभवी आणि पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या काब्राल यांना पुन्हा संधी देऊन दक्षिण गोव्यातील राजकीय समीकरणे जुळवण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.
नीलेश काब्राल यांना मंत्रिपदाच्या त्यागाचे फळ मिळण्याचे संकेत
नव्या मंत्रिमंडळ फेररचनेत एक मंत्रिपद महिलेला मिळावे, अशी अट केंद्रीय नेतृत्वाने ठेवली आहे. त्यामुळे या नव्या फेररचनेत दोन मंत्रिपदांचा समावेश होणार आहे. महिला आमदार म्हणून शिवोली मतदारसंघाच्या आमदार डिलायला लोबो यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या पदावर कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांची पुन्हा वर्णी लागण्याची शक्यता आहे. या बदलांमुळे मंत्रिमंडळात नवीन ऊर्जा आणि महिला प्रतिनिधित्व वाढण्यास मदत होईल, असे राजकीय जाणकारांचे मत आहे.
महिला प्रतिनिधित्वासाठी डिलायला लोबो यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची चिन्हे