विकासकामांचा धडाका सुरू : पावसाळ्यानंतर निवडणुकांची शक्यता

पणजी : सध्याच्या गोवा विधानसभेचा कार्यकाळ मार्च २०२७ मध्ये संपणार असला तरी, त्याआधीच राज्यात विधानसभा निवडणुका होण्याचे संकेत मिळत आहेत. नोकरभरतीसह विकासकामे वेगाने सुरू असून, पावसाळ्यानंतर कधीही निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी अलीकडेच राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची दिल्लीत भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली. संघटन बळकटीकरणासह आगामी कार्ययोजनांवर यावेळी चर्चा झाली, असे दामू नाईक यांनी सांगितले. या भेटीनंतर दामू नाईक गोव्यात परतले, तर मुख्यमंत्र्यांनी तिथेच थांबून केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचीही भेट घेतली.
मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय चर्चांना उधाण
फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक ९ एप्रिल रोजी होणार होती. मात्र, त्याच्या आदल्या दिवशीच मुंबई उच्च न्यायालयाने ही निवडणूक रद्द केली. या घडामोडीनंतर लगेचच मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी राष्ट्रीय अध्यक्षांची भेट घेतली. विधानसभेचा कार्यकाळ संपण्यासाठी अद्याप सुमारे १० महिने बाकी असतानाच राज्यात निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. आचारसंहितेचा विकासकामांवर परिणाम होऊ नये, या उद्देशाने नगरपालिका निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणांचा धडाका सुरू असल्याने मुदतीपूर्वी निवडणुकांचे संकेत मिळत आहेत.
आचारसंहितेपूर्वी विकासकामे पूर्ण करण्यावर सरकारचा भर
पर्वरी येथील एलिव्हेटेड कॉरिडॉरचे काम सध्या वेगाने सुरू आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी आधी ऑक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, आता कंत्राटदाराला हे काम चतुर्थीपूर्वीच पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. चतुर्थीपूर्वी या कॉरिडॉरचे उद्घाटन होईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री दिगंबर कामत यांनी सांगितले. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. कर्मचाऱ्यांच्या भरती आयोगामार्फत नोकरभरतीच्या जाहिरातींसह परीक्षा प्रक्रिया राबवली जात आहे. येत्या काही महिन्यांत सरकारी तसेच खासगी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर भरती करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नोकरभरती आणि पर्वरी कॉरिडॉरच्या कामाला मिळाली गती
बुधवारी वाहतूक संचालनालयाच्या पर्वरी येथील नव्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. तसेच, डिचोली बसस्थानकाचे काम अपूर्ण असतानाही त्याच्या उद्घाटनाची हालचाल सुरू झाली आहे. विविध प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण करून उद्घाटने उरकण्यावर भर दिला जात आहे. फोंडा पोटनिवडणूक रद्द झाल्यामुळे हा मतदारसंघ सध्या आमदारविरहित आहे. अलीकडेच झालेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले आहे, तर राज्यातील विरोधी पक्ष विस्कळीत अवस्थेत आहे. या सर्व राजकीय परिस्थितीचा फायदा घेत मुदतीपूर्वी निवडणुका घेण्याचा विचार पक्ष पातळीवर सुरू असून, भाजपकडून आता मेळावे व बैठकींची मालिका सुरू केली जाणार आहे.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून बैठका आणि मेळाव्यांचे नियोजन
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत राज्यात ‘भारत नेट’ प्रकल्पाचे काम वेगाने पूर्ण करण्याची आणि कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी मूलभूत सुविधा उभारण्याची मागणी करण्यात आली. ग्रामीण भागातील इंटरनेट समस्या दूर करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे. निवडणुकांपूर्वी जास्तीत जास्त लोकोपयोगी कामे मार्गी लावण्याचा सरकारचा मानस यातून स्पष्ट होत आहे.
‘भारत नेट’ प्रकल्पासाठी मुख्यमंत्र्यांचा केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा