दक्षिण गोव्यात ५, ६ रोजी पाणीपुरवठा ठप्प

साळावलीतील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th April, 10:09 pm
दक्षिण गोव्यात ५, ६ रोजी पाणीपुरवठा ठप्प

मडगाव : साळावली येथील १६० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या १२०० मिमी व्यासाच्या मुख्य पीएससी जलवाहिनीच्या देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे ५ आणि ६ मे रोजी दक्षिण गोव्यातील बहुतांशी भागांतील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असून, ७ मे रोजी तो मर्यादित स्वरूपात असेल. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात नोटीस जारी करून नागरिकांना पूर्वकल्पना दिली आहे. या दुरुस्तीच्या कामामुळे केपे, कुंकळ्ळी, कुडतरी, मडगाव, फातोर्डा, नुवे, कुठ्ठाळी, दाबोळी, वास्को, मुरगाव यासह दक्षिण गोवा किनारपट्टी भागातील पाणीपुरवठ्यावर थेट परिणाम होणार आहे.

दक्षिण गोव्यातील पाणीपुरवठा दोन दिवस पूर्णपणे ठप्प राहणार

या भागात ५ व ६ मे रोजी पाणीपुरवठा बंद राहील आणि ७ मे रोजी तो पूर्ववत होण्यास सुरुवात होईल, मात्र त्या दिवशी पाण्याचा दाब मर्यादित असेल. नागरिकांनी या काळात पाण्याची साठवणूक करून ठेवावी, जेणेकरून कामाच्या कालावधीत कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. मुख्य वाहिनीचे काम पूर्ण झाल्यावर पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत केला जाईल, असे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

साळावली मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियोजन

मुख्य वाहिनीचे काम सुरू असले तरी, १०० एमएलडी क्षमतेचा साळावली जलशुद्धीकरण प्रकल्प नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहे. या काळात नागरिकांना होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगिरी व्यक्त करत असून, सर्वांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाने केले आहे. देखभाल दुरुस्तीचे हे काम पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

१०० एमएलडी प्रकल्प सुरू राहणार; पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन

#SouthGoaWaterSupply #MargaoNews #Vasco #PWDGoa #SelaulimWaterProject #GoaNews #WaterCrisisGoa #MarathiNews