बोरीमळ-केपे येथील क्रीडा संकुलातील जलतरण तलाव धूळ खात

दहा महिन्यांपासून सुविधा बंद : परिसरात साथरोग पसरण्याची भीती

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
10 mins ago
बोरीमळ-केपे येथील क्रीडा संकुलातील जलतरण तलाव धूळ खात

सांगे : येथील बोरीमळ-केपे क्रीडा संकुलातील जलतरण तलाव मागील १० महिन्यांपासून बंद असल्याने पाण्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. तलावातील पाणी दूषित होऊन त्यात जंतूंची पैदास झाली असून, यामुळे परिसरात टायफॉइड, कॉलरा आणि गॅस्ट्रोसारखे गंभीर आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. एकेकाळी खेळाडूंनी गजबजलेला हा तलाव आता केवळ आजारांना निमंत्रण देणारे केंद्र बनला आहे.

दूषित पाण्यामुळे परिसरात साथीचे आजार पसरण्याची भीती

हा जलतरण तलाव गेल्या अनेक वर्षांपासून उत्तम रितीने सुरू होता. या ठिकाणी प्रशिक्षित प्रशिक्षक आणि जीवरक्षकही (लाईफ गार्ड) उपलब्ध होते. मात्र, मागील १४ जुलै २०२५ पासून कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे हा तलाव बंद ठेवण्यात आला असून प्रशासनाच्या या भूमिकेबद्दल स्थानिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. क्रीडा संकुल असूनही खेळाडूंना याचा लाभ घेता येत नाहीये.

कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे १४ जुलैपासून जलतरण तलावाला कुलूप

तलावातील साचलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. जनतेच्या करातून उभारलेल्या या वास्तूची योग्य देखभाल करणे सरकारची जबाबदारी आहे. याप्रकरणी क्रीडा खाते आणि आरोग्य विभागाने तातडीने लक्ष देऊन तलावाची स्वच्छता करावी आणि तो पुन्हा खुला करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशाराही रहिवाशांनी दिला आहे.

साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ती; क्रीडा खात्याच्या दुर्लक्षाबद्दल संताप

जलतरण तलावाची सद्यस्थिती पाहता त्यात बुरशी आणि कीटक तयार झाले आहेत. येथील प्रसाधनगृहांची परिस्थितीही अत्यंत बिकट असून नागरिकांना तिथे जाणे कठीण झाले आहे. स्थानिक आमदारांनी या प्रकरणात लक्ष घालण्याची गरज असून, तलाव सुरू झाल्यास बेरोजगारांना रोजगाराची संधीही मिळेल, असे सुखला केणी यांनी सांगितले. तातडीने कार्यवाही न झाल्यास परिस्थिती अधिक हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

प्रसाधनगृहांची दुरवस्था आणि स्थानिक लोकप्रतिनिधींकडून हस्तक्षेपाची मागणी

#SanguemNews #QuepemSportsComplex #SwimmingPool #GoaHealth #SportsAuthorityOfGoa #GoaNews #MarathiNews #BreakingNews