वनविभागाच्या छाप्यात तिघे जेरबंद

देवगड : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील तळेबाजार येथे सावंतवाडी वनविभागाने गुरुवारी (३० एप्रिल) मोठी कारवाई करत सुमारे ८ कोटी रुपये किमतीचे ‘अंबरग्रीस’ (व्हेल माशाची उलटी) जप्त केले. याप्रकरणी देवगडमधील तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेबाजार परिसरात काही व्यक्ती अंबरग्रीस विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती सावंतवाडी उपवनसंरक्षकांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाने एक विशेष पथक तयार केले. संशयितांना पकडण्यासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी बनावट ग्राहक बनून संशयितांशी संपर्क साधला. विक्रीसाठी ठरलेल्या ठिकाणी संशयित येताच, दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना मुद्देमालासह रंगेहात पकडले. या कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून ८ किलो ८०० ग्रॅम वजनाचे अंबरग्रीस हस्तगत केले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत याची किंमत अंदाजे ८ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणी योगेश गणपत करंजेकर (वय ४२, रा. इळये), विष्णू धाकू धुरत (वय ३३, रा. आनंदवाडी), संतोष काशिराम नाडणकर (वय ५६, रा. वरेरी) यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
वन्यजीव कायद्यांतर्गत कारवाई
या तिन्ही संशयितांवर वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार (कलम ९, ३९, ४४, ४९, ५१ इ.) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सावंतवाडी उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक डॉ. एस. के. लाड, कणकवली वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. पाटील आणि त्यांच्या पथकाने यशस्वी केली.
वनविभागाचे आवाहन
या तस्करीच्या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा समावेश आहे का, याचा तपास वनविभाग करत आहे. या गुन्ह्याबाबत कोणाकडेही काही माहिती असल्यास ती सावंतवाडी वनविभागाला द्यावी, माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आवाहन वनविभागाने केले आहे.