२२ वर्षीय तरुणाला अटक; दोन्ही प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा संशय

कोल्हापूर : महाराष्ट्रात (Maharashtra) महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण करणारी आणखी एक घटना कोल्हापूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. २२ वर्षीय तरुणाने अनेक तरुणींना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा आणि त्यांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ब्लॅकमेल केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाहिद समीर सनादी (२२ वर्षे) या संशयिताला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हातकणंगले तालुक्यातील शाहिद समीर सनादी (Shahid Sameer Sanadi) (वय २२) हा फार्मसीचा विद्यार्थी असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांना कोल्हापूर (Kolhapur) आणि शिरोळी (Shiroli) परिसरातील लॉजमध्ये नेऊन त्यांच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनांचे गुपचूप चित्रीकरण करून ते व्हिडिओ नंतर ब्लॅकमेलसाठी वापरण्यात आले, असे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा भंडाफोड आरोपीच्या एका जवळच्या मित्राने केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर २० वर्षीय तरुणीने २६ एप्रिल रोजी पोलिसांत तक्रार दाखल केली. स्थानिक न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
तक्रारीनुसार, आरोपीने संबंधित तरुणीला व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत वारंवार मानसिक आणि शारीरिक छळ केला. काही व्हिडिओ मित्रांमध्येही शेअर केल्याचा आरोप आहे.
दरम्यान, काही संघटनांनी असा दावा केला आहे की; आरोपीने अशाच प्रकारे सुमारे १५ तरुणींना लक्ष्य केले असून; त्यांचे वय १८ ते २२ वर्षांदरम्यान आहे. मात्र, पोलिसांकडून या दाव्यांची पडताळणी सुरू आहे.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि बजरंग दल यांसारख्या संघटनांनी पोलिसांकडे निवेदन देत सखोल चौकशी व आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी परिस्थिती लक्षात घेऊन सुरक्षा व्यवस्था कडक केली आहे.
पीडित तरुणींनी तक्रार देण्यास पुढे यावे : पोलीस
पोलिसांनी इतर संभाव्य पीडित तरुणींना पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले असून; त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याचे आश्वासन दिले आहे. शिरोळी, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील इतर तरुणी, महिला या प्रकाराला बळी पडल्या आहेत का, याचा तपास सुरू आहे.
अमरावतीनंतर दुसरे मोठे प्रकरण उघडकीस
दरम्यान, अमरावतीत (Amravati ) आदल्यादिवशी लैंगिक अत्याचारप्रकरणी संशयित मोहम्मद अयाझ उर्फ तन्वीर याला अनेक अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण (sexual abuse ) करून व्हिडीओ व्हायरल केल्याप्रकरणी अटक केल्यानंतर दुसऱ्या दिवशी कोल्हापूरची घटना उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संशयित आरोपी मोहम्मद अयाझ उर्फ तन्वीर याच्यावर वॉट्सअॅप व स्नॅपचॅटच्या माध्यमातून वेगवेगळी आमिषे दाखवून १८० मुलींचे लैंगिक शोषण करून ३५० अश्लील व्हिडीओ बनवून व्हायरल केल्याचा आरोप आहे.
दोन्ही प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा संशय
वरील दोन्ही प्रकरणात ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त करण्यात येत असून, याप्रकरणी सखोल चौकशी करून एकूण प्रकरणाचा पूर्णपणे पर्दाफाश करण्याचा व पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी करण्यात येत आहे.