
ओडिशा : बँकेतून पैसे काढण्यासाठी खातेदाराला प्रत्यक्ष हजर करण्याच्या बँकेच्या अट्टाहासामुळे एका हताश भावाने आपल्या मृत बहिणीचा सांगाडाच बँकेत आणल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना ओडिशाच्या केओंझार जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे बँक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, पत्न ब्लॉकमधील दियानाली गावातील रहिवासी जितू मुंडा (५०) यांच्या थोरल्या बहिणीचे, कालरा मुंडा (५६) यांचे २६ जानेवारी २०२६ रोजी निधन झाले होते. कालरा यांच्या बँक खात्यात काही रक्कम जमा होती. कौटुंबिक गरजेसाठी जितू मुंडा यांना या खात्यातून २०,००० रुपये काढायचे होते. यासाठी त्यांनी मालपोसी येथील 'ओडिशा ग्रामीण बँके'च्या शाखेत अनेकवेळा चकरा मारल्या.
'खातेदाराला घेऊन या' - बँकेचा अजब पवित्रा
जितू मुंडा हे अशिक्षित असल्याने त्यांना कायदेशीर वारसदार किंवा नामांकनाची (Nominee) प्रक्रिया माहित नव्हती. त्यांनी बँकेला बहिणीच्या निधनाबद्दल वारंवार सांगितले, मात्र बँक कर्मचाऱ्यांनी त्यांचे म्हणणे ऐकून न घेता "खातेदाराला प्रत्यक्ष घेऊन या, तरच पैसे मिळतील" असा हट्ट धरला. शेवटी हताश झालेल्या जितू यांनी बहिणीचे थडगे खोदून तिचा सांगाडा बाहेर काढला आणि तो खांद्यावर घेऊन ते थेट बँक गाठली.
बँकेत सांगाडा पाहताच कर्मचाऱ्यांची आणि ग्राहकांची एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे निरीक्षक किरण प्रसाद साहू यांनी बँकेत धाव घेतली. पोलिसांनी जितू मुंडा यांची समजूत काढली आणि त्यांना कायदेशीररीत्या पैसे मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पोलिसांच्या उपस्थितीत तो सांगाडा पुन्हा दफन करण्यात आला.
बँकेची चूक आणि पुढील कार्यवाही
बँक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कालरा मुंडा यांच्या खात्यावरील नामनिर्देशित व्यक्तीचाही मृत्यू झाला असून जितू मुंडा हेच एकमेव वारसदार आहेत. स्थानिक गटविकास अधिकाऱ्यांनी (BDO) या प्रकरणात लक्ष घातले असून, जितू मुंडा यांना लवकरात लवकर पैसे मिळवून देण्याचे निर्देश बँकेला दिले आहेत. एका अशिक्षित आदिवासी व्यक्तीला नियम समजावून सांगण्यात बँक अधिकारी अपयशी ठरल्याने स्थानिक स्तरावर संताप व्यक्त होत आहे.