
पणजी : म्हापसा कृषी उत्पन्न बाजार समितीने म्हापसा बाजारामागील नैसर्गिक नाला कचरा टाकून बुजवला आहे. यामुळे येणाऱ्या पावसाळ्यात बाजार परिसरात पाणी साचून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बेकायदेशीरपणे नाला बुजवणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी 'टुगेदर फॉर म्हापसा' या संघटनेने केली आहे. मंगळवारी संघटनेच्या शिष्टमंडळाने उत्तर गोवा जिल्हाधिकारी अंकित यादव यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन सादर केले. यावेळी ॲड. महेश राणे, जितेश कामत, विजय भिडे आणि राजेश मराठे उपस्थित होते.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ॲड. महेश राणे यांनी सांगितले की, गेल्या पंधरा दिवसांपूर्वी बाजार समितीने या नैसर्गिक नाल्यात कचरा टाकून तो बुजवला आहे. मुळात बाजारातील कचरा गोळा करण्यासाठी स्वतंत्र कंत्राट काढण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदार कचरा गोळा करत नाहीत. तिथे कचरा एकतर जाळला जातो किंवा नाल्यात टाकला जातो; याचे व्हिडिओ पुरावे आमच्याकडे उपलब्ध आहेत. या संपूर्ण प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला असण्याची दाट शक्यता असून जिल्हाधिकाऱ्यांनी याची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी आम्ही केली आहे.
ते पुढे म्हणाले की, याशिवाय बाजार परिसरात सुरू असलेले अन्य अवैध व्यवहार आणि तिथे पसरलेली अस्वच्छता याविषयीची माहितीही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना दिली आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी नाल्यातील कचरा तातडीने उपसणे आवश्यक आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रकरणी उपजिल्हाधिकारी आणि गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्याचे आश्वासन दिले आहे. सरकारने या प्रकरणात कृषी उत्पन्न बाजार समिती तसेच कचरा कंत्राटदार यांच्यावर तात्काळ कारवाई करणे गरजेचे आहे. कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास भविष्यात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.