तपास यंत्रणांनी सत्य समोर आणण्याची गरज : अॅड. अमेय प्रभुदेसाई, सोहम नाईकचे वकील.

मडगाव : संशयित सोहम नाईक याच्याविरोधात एकूण पाच गुन्हे नोंद आहेत. मात्र, त्यातील पहिल्या प्रकरणातील पीडितेने न्यायालयासमोर हजर होत, सोहमविरोधात आपली कोणतीही तक्रार नसल्याचे स्पष्ट केले आहे. इतकेच नव्हे, तर तक्रार दाखल करण्यासाठी आपल्यावर दबाव आणला होता, असेही तिने नमूद केले आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान हा जबाब नोंदवण्यात आला असल्याची माहिती सोहम नाईकचे वकील अॅड. अमेय प्रभुदेसाई यांनी दिली.
कुडचडे येथील लैंगिक अत्याचार प्रकरणात आता नवीन वळण मिळत आहे. अॅड. अमेय यांनी सांगितले की, सोहम नाईकच्या अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला होता. या अर्जावरील सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला अटक करू नये, असे निर्देश देत न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. त्यानंतरच्या सुनावणीवेळी पोलिसांनी सोहमच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयात सांगितले. पोलिसांनी अटकेची गरज नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे, अटकपूर्व जामीन अर्जाचा मूळ उद्देश पूर्ण झाला आणि पर्यायाने तो अर्ज मागे घेण्यात आला.
या प्रकरणात ज्या पीडितेने तक्रार दाखल केली होती, तिने आता न्यायालयात आपली बाजू मांडताना खळबळजनक दावा केला आहे. माझी कोणतीही तक्रार नसून तक्रार करण्यासाठी माझ्यावर दबाव होता. जी काही सत्य परिस्थिती होती, ती मी न्यायदंडाधिकार्यांसमोर जबाबात सांगितली आहे, असे तिने स्पष्ट केले.
अॅड. प्रभुदेसाई पुढे म्हणाले की, सोहम नाईक हा २० वर्षीय युवक आहे. कोणालातरी लक्ष्य करून गुन्हा नोंदवणे आणि कोणावर तरी दबाव आणून तक्रार करायला लावणे हे अत्यंत अयोग्य आहे. त्यामुळे तपास यंत्रणांनी या बाजूनेही सखोल तपास करावा आणि जे काही सत्य आहे, ते लोकांसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.