माधव खट्टरच्या जामीन अर्जावरील निकाल वास्को प्रथम वर्ग न्यायालयाने ठेवला राखून

पणजी : सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेला संशयित माधव खट्टर याच्या जामीन अर्जावर आज वास्को प्रथमवर्ग न्यायालयात (JMFC) महत्त्वपूर्ण सुनावणी पार पडली. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला असून, तो आज मंगळवारी सायंकाळी किंवा उद्या बुधवारी सकाळी जाहीर केला जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या प्रकरणात संशयित माधव खट्टर याचा भाषणाशी थेट संबंध नसल्याची बाब पोलीस तपासात समोर आल्याने माधव खट्टरला मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.
हे संपूर्ण प्रकरण १८ एप्रिल रोजी वास्को येथे झालेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमातून सुरू झाले. या कार्यक्रमात गौतम खट्टर याने सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्याविरोधात वादग्रस्त विधान केले होते, ज्याचे तीव्र पडसाद संपूर्ण गोव्यात उमटले होते. ख्रिस्ती बांधवांनी या विधानाचा निषेध करत पोलिसांकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर गोवा पोलिसांच्या गुन्हे शाखेने वेगाने तपास करत गुरुवारी गौतमचा भाऊ माधव खट्टर याला हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथून ताब्यात घेऊन गोव्यात आणले. गौतमचे भाषण माधव यानेच लिहिले असा ठपका ठेवून त्याला अटक करण्यात आली. गौतमची गोव्यातील सर्व व्यवस्था माधवनेच केल्याचे पोलिसांनी जाहीर केले होते. त्याला गुरुवारीच न्यायालयात हजर करण्यात आले व तेथे त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. चार दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर सध्या १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
आज झालेल्या सुनावणीत माधव खट्टरचे वकील अॅड. अमेय प्रभुदेसाई यांनी बाजू मांडली. न्यायालयाबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला. अॅड. प्रभुदेसाई म्हणाले, पोलिसांनी सुरुवातीला असा दावा केला होता की गौतम खट्टरला ते वादग्रस्त भाषण माधवने लिहून दिले होते. मात्र, आता सखोल तपासाअंती खुद्द पोलिसांनीच न्यायालयात कबुली दिली आहे की, ते भाषण गौतम खट्टरने स्वतःच लिहिले आणि त्यावर तो स्वतःच व्यक्त झाला. यामध्ये १८ वर्षीय माधवची कोणतीही भूमिका नसल्याचे आता निष्पन्न झाले आहे.
माधवच्या अटकेच्या कायदेशीर प्रक्रियेवरही अॅड. प्रभुदेसाई यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्या गुन्ह्यात सात वर्षांपेक्षा कमी शिक्षेची तरतूद आहे, अशा प्रकरणात 'अर्णेश कुमार' आणि 'सत्येंद्र कुमार अंतिल' यांसारख्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांनुसार अटकेपूर्वी नोटीस देणे अनिवार्य आहे. मात्र, या प्रकरणात कायद्याच्या प्रक्रियेचे उल्लंघन करून एका १८ वर्षांच्या तरुणाला थेट अटक करण्यात आली, जी पूर्णपणे अनावश्यक होती व टाळता आली असती, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनीही आता माधवच्या कोठडीची गरज नसल्याचे सांगितल्याने, या तांत्रिक मुद्यांच्या आधारे जामीन मिळण्याची आशा माधव खट्टरच्या वकिलांनी व्यक्त केली आहे. सध्या सर्वांचे लक्ष न्यायालयाच्या अंतिम आदेशाकडे लागले आहे.