दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत मिळवले ९५ टक्क्यांहून अधिक गुण; पालकांसह शाळेचे नाव केले उज्ज्वल

पणजी : नुकत्याच जाहीर झालेल्या गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (SSC) इयत्ता १० वीच्या परीक्षेत विहान समीर च्यारी याने ९५ टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. विहानने कोकणी विषयात १०० पैकी ९९ गुण मिळवून संपूर्ण गोव्यात प्रथम येण्याचा मान पटकावला.
विहान हा पर्वरी येथील एसीडीआयएल (ACDIL) हायस्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने सुरुवातीपासूनच अभ्यासात सातत्य राखले होते. केवळ शालेय स्तरावरच नव्हे, तर संपूर्ण पर्वरी मतदारसंघात त्याने अव्वल स्थान पटकावले. आपल्या आवडत्या कोकणी विषयात त्याने मिळवलेले ९९ गुण हे त्याच्या अभ्यासाप्रती असलेल्या चिकाटीचे आणि भाषेवरील प्रभुत्वाचे प्रतीक मानले जात आहेत. विहानच्या या यशाने त्याच्या शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. भाषा स्तरावर विचार करता यंदा कोकणीचा निकाल ९५.३४ टक्के लागला. यात विहान याने सर्वाधिक ९९ गुण पटकावले.
विहानच्या या यशाचे श्रेय त्याने आपले शिक्षक आणि पालकांना दिले आहे. त्याचे वडील बाबा समीर च्यारी आणि आई गौरी च्यारी यांनी विहानच्या शैक्षणिक प्रवासात त्याला नेहमीच प्रोत्साहन दिले. त्याच्या पुढील उच्च शिक्षणासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक, नातेवाईक आणि मित्रपरिवाराकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.