
पणजी : साहित्यलेणी प्रतिष्ठान आणि इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, २ मे रोजी सातव्या मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन सकाळी ९ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाच्या सभागृहात पार पडणार आहे. प्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी-जोगळेकर या संमेलनाध्यक्ष असतील, अशी माहिती रजनी रायकर यांनी मंगळवारी पणजीत झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी कालिका बापट, चित्रा क्षीरसागर आणि दया मित्रगोत्री उपस्थित होत्या.
संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीनिवास धेंपो असून मिलिंद महाजन यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. शनिवार, २ मे रोजी सकाळी ९:३० वाजता ग्रंथदिंडीने संमेलनाची सुरुवात होईल. त्यानंतर उद्घाटन सोहळा संपन्न होईल, ज्यामध्ये अनुराधा ठाकूर, लक्ष्मी जोग, उषा परब, गजानन देसाई आणि डॉ. संगीता गोडबोले यांचा विशेष सन्मान केला जाणार आहे. याच सत्रात गोव्यातील चार आणि महाराष्ट्रातील एका साहित्यिकाच्या पुस्तकांचे प्रकाशनही करण्यात येईल.
दुपारी १२ ते १:१५ या वेळेत 'कथा, कविता आणि कादंबरीमधील स्त्री जाणिवा' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारच्या सत्रात कालिका बापट या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांची, तर संगीता अभ्यंकर या अनुराधा ठाकूर यांची मुलाखत घेतील. संध्याकाळी ४:३० वाजता 'कवितेची जुगलबंदी' हा कार्यक्रम रंगणार असून, त्याचे अध्यक्षपद संगीता गोडबोले आणि माधवराव सटवाणी भूषवतील. या जुगलबंदीमध्ये ३४ कवी-कवयित्री सहभागी होणार आहेत. या संमेलनात गोव्यासह महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश येथील साहित्यप्रेमी उपस्थित राहणार असून, गोव्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रजनी रायकर यांनी केले आहे.