मांडवी नदीत नवीन जहाज तात्पुरते नांगरण्यास परवानगी!

‘एजी’ची न्यायालयात माहिती : पुढील सुनावणी उद्या

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
27th April, 11:50 pm
मांडवी नदीत नवीन जहाज तात्पुरते नांगरण्यास परवानगी!

पणजी : बंदर कप्तानने मांडवी नदीत नवीन जहाज केवळ तात्पुरते नांगरण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती अॅडव्होकेट जनरल देवीदास पांगम यांनी दिली. त्यासाठी सदर जागेची पाहणी केल्याची माहिती देत न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला. तर याचिकादारांना सदर जहाजाची माहिती पूर्वीपासून होती. असे असताना ऐनवेळी जहाजाचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयात धाव घेतल्याचा दावा कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील दारियस जे. खंबाटा यांनी केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवार २८ रोजी होणार आहे.
‘इनफ इज इनफ’ या संस्थेचे सदस्य स्वातंत्र्यसैनिक लिबिया लोबो सरदेसाई, उदय भेंब्रे, सुदीप ताम्हणकर आणि हरिष मडकईकर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकादारांतर्फे ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी बाजू मांडली. मांडवी नदीत ७० प्रवासी क्षमतेच्या लहान बोटीऐवजी २ हजार प्रवासी क्षमतेचे महाकाय जहाज आणले जात असून, हे गोवा जुगार कायद्याचे आणि सरकारी अधिसूचनांचे उल्लंघन असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
या प्रकरणी मागील सुनावणी वेळी याचिकादारातर्फे ओडीशा उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश तथा ज्येष्ठ वकील एस. मुरलीधर यांनी बाजू मांडली होती. त्यात त्यांनी मांडवी नदीत ७० सीटरच्या लहान कॅसिनो बोटीच्या जागी २ हजार प्रवासी क्षमतेची मोठी कॅसिनो जहाज आणली जात आहे. सदर जहाज गोवा सार्वजनिक जुगार कायदा तसेच सरकारने जारी केलेल्या अधिसूचना आणि इतर परिपत्रकांना बगल देत वरील जहाजाला आणण्यासाठी परवानगी दिल्याचा मुद्दा उपस्थित केला. तसेच सदर जहाज उडपीहून गोव्यासाठी मार्गक्रमण करत आहे. ती कधीही गोव्यात पोहचण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. याशिवाय परवानगी देताना कॅसिनोचा किंवा जुगार कायद्याचा कोणताही उल्लेख केला नाही, असा मुद्दा उपस्थित न्यायालयात उपस्थित केला.
दरम्यान, प्रतिवादी कॅसिनो कंपनीतर्फे ज्येष्ठ वकील दारियस जे. खंबाटा यांनी बाजू मांडली. त्यात त्यांनी याचिकादारांना सदर जहाजाची माहिती पूर्वीपासून होती. असे असताना ऐनवेळी जहाजाचा मुद्दा उपस्थित करून न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच विद्यमान कॅसिनोची क्षमता वाढवण्यावर कायद्याने कोणतीही बंदी नाही. यामुळे कॅसिनोच्या क्षमतेतील वाढ कायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी मंगळवारी ठेवली आहे.
सरकारची न्यायालयात भूमिका
अ‍ॅडव्होकेट जनरल पांगम यांनी न्यायालयात अहवाल सादर करताना सांगितले की, जहाजाच्या जागेची पाहणी करण्यात आली आहे. बंदर कप्तानने मांडवी नदीतील नवीन जहाजाला सध्या केवळ तात्पुरती परवानगी देण्यात आली असून, जहाजाची नोंदणी, आवश्यक प्रमाणपत्रे आणि इतर अटींची पूर्तता झाल्यानंतरच पुढील परवानग्या दिल्या जातील. सध्या जहाजाला पूर्णपणे कार्यान्वित होण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे मंजूर केलेली नाहीत.

हेही वाचा