जुने म्हार्दोळ येथे धक्कादायक घटना; रागाच्या भरात मोबाईल फोडून संपवले जीवन

पणजी : मोबाईलवर केलेल्या कॉलला प्रतिसाद दिला नाही, या एका कारणाने आलेल्या नैराश्यातून १८ वर्षीय युवकाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना जुने म्हार्दोळ येथे उघडकीस आली आहे. चंद्रहास ओराव असे या मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मूळचा झारखंड येथील असलेला चंद्रहास हा गेल्या काही काळापासून गोव्यात आपल्या आईसोबत वास्तव्यास होता. वेर्णा औद्योगिक वसाहतीतील एका नामांकित फार्मा कंपनीत तो हाऊसकिपिंग विभागात कामाला होता. मार्च २०२६ मध्ये त्याने ती नोकरी सोडली आणि तो आपल्या मूळ गावी झारखंडला परतला होता. मात्र, उदरनिर्वाहासाठी तो २२ एप्रिल रोजी पुन्हा गोव्यात परतला आणि वेर्णा औद्योगिक वसाहतीतीलच दुसऱ्या एका कंपनीत कामाला रुजू झाला होता. गोव्यात परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले.
मिळालेल्या माहितीनुसार, २५ एप्रिल रोजी रात्री आठच्या सुमारास चंद्रहासने आपल्या मैत्रिणीला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारंवार फोन करूनही पलीकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यामुळे चंद्रहास प्रचंड अस्वस्थ झाला. याच कारणावरून त्याचे त्याच्या आईसोबतही खटके उडाले. संताप अनावर झाल्याने त्याने आपला मोबाईल जमिनीवर आपटून फोडून टाकला आणि रागाच्या भरात तो घराबाहेर पडला. बराच वेळ झाला तरी मुलगा घरी परतला नसल्याने चिंतेत पडलेल्या आईने परिसरात शोधाशोध केली, परंतु रात्री त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.
दुसऱ्या दिवशी, म्हणजेच काल २६ एप्रिल रोजी सकाळी जुने म्हार्दोळ येथील एका निर्जन भागात चंद्रहासचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. गळफास लावण्यासाठी त्याने आपल्याच शर्टाचा वापर केला होता. या घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. वेर्णा पोलीस निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रिस्ली कार्वालो या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.