शेतकर्यांकडून आयोजन : ७०० हून अधिक नागरिकांची उत्सवाला भेट

मडगाव : गोव्याचा पारंपरिक भात प्रकार असलेल्या कोरगुट तांदळाला मिळालेल्या जीआय टॅगचे औचित्य साधून लोटली येथे कोरगुट उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवाला ७०० हून अधिक नागरिकांनी भेट दिली, ज्यात युवावर्गाचा सहभाग जास्त होता.
लोटली येथे आयोजित या उत्सवावेळी खाजण जमिनीतील कोरगुट भाताची पारंपरिक शेती पद्धतीचा अनुभव लोकांना घेता आला. कोरगुटचे बियाणे रुजण्यापासून ते मळणीपर्यंत आणि शेवटी भातापासून तांदूळ तयार करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेचे प्रत्यक्ष सादरीकरण याठिकाणी दाखवण्यात आले. या प्रदर्शनात कोडोपासून ते मातीच्या मडक्यांपर्यंत पूर्वजांनी वापरलेली सर्व पारंपरिक साधने मांडण्यात आली होती. जुन्या काळातील कृषी साधनांची माहितीही देण्यात आली.
उपस्थित असलेल्या युवा पिढीला गोव्यातील समृद्ध संस्कृतीचा हा वारसा पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले. या उत्सवावेळी रूपेश जोगाळे यांच्या दिग्दर्शनाखाली कला अंकुर महिला संघ, लोटली यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराने उत्सवाची रंगत वाढवली. आमदार विजय सरदेसाई यांनी या उपक्रमाच्या ठिकाणी भेट देत लोटलीतील शेतकर्यांच्या कष्टाचे कौतुक केले आणि शेतकर्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
चिखली युथ फार्मर्स क्लबसोबत उपस्थित राहिलेल्या फा. बोलमॅक्स परेरा यांनी या उपक्रमाची प्रशंसा केली. इमारती व रस्ते उभारणी केली म्हणजे विकास होत नाही तर पोटाला अन्नही आवश्यक आहे. त्यामुळे जेन झी या नव्या पिढीने हा वारसा पुढे नेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
गोवा कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश कुंकळ्येकर आणि कृषी खात्याचे निवृत्त संचालक नेल्सन फिगेरेदो यांच्यासह विभागीय कृषी अधिकारी शेरीफ फुर्तादो यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन प्राचीन पद्धतींची माहिती घेतली. या कार्यक्रमाला मरिनो रिबेलो यांचीही उपस्थिती होती.
कोरगुट वाणाचे संवर्धन
या उत्सवामुळे पुराचा आणि खार्या पाण्याचा यशस्वी प्रतिकार करणार्या कोरगुट या भाताच्या वाणाचे संवर्धन करणार्या शेतकर्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. गोव्याच्या विसरत चाललेल्या पारंपरिक शेती पद्धतींना नव्याने उजाळा मिळाला असून, या उपक्रमामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.