
भुवनेश्वर : देशाच्या विविध भागांत उन्हाचा तडाखा वाढत असताना, ओडिशामध्ये जनगणनेच्या (Census) कामासाठी नियुक्त केलेल्या दोन शिक्षकांचा दोन दिवसांत उष्माघातामुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मयूरभंज जिल्ह्यातील राजकपूर हेब्रम आणि सुंदरगड जिल्ह्यातील अनुराग एक्का या शिक्षकांचा घरोघरी सर्वेक्षण करून परतत असताना मृत्यू झाला.
पहिली घटना मयूरभंज जिल्ह्यातील बेतनाटी भागात घडली. बैद्यनाथ हायस्कूलचे शिक्षक राजकपूर हेब्रम हे रविवारी घरोघरी जाऊन जनगणनेचे सर्वेक्षण करून परतल्यानंतर अचानक बेशुद्ध पडले. त्यांना तातडीने बारिपडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांना तीन गावांच्या सर्वेक्षणाचे काम देण्यात आले होते. हेब्रम यांच्या कुटुंबीयांनी आरोप केला आहे की, प्रकृती ठीक नसतानाही वरिष्ठांकडून कामासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जात होता.

दुसरी घटना सुंदरगड जिल्ह्यात घडली. जारडा सरकारी हायस्कूलचे शिक्षक अनुराग एक्का हे शनिवारी जनगणनेचे कर्तव्य बजावत असतानाच आजारी पडले. त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली. या दोन्ही जिल्ह्यांमध्ये तापमान ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उष्माघातामुळे हे मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
संपूर्ण देशाला सध्या तीव्र उन्हाच्या लाटेने ग्रासले असून महाराष्ट्रातील विदर्भासह ओडिशा, कर्नाटक आणि केरळमध्ये परिस्थिती चिंताजनक बनली आहे. केवळ ओडिशातच नव्हे, तर कर्नाटक आणि केरळमध्येही उष्माघाताचे बळी गेल्याचे वृत्त आहे. कर्नाटकातील बेळगावमध्ये ३५ वर्षीय सरकारी अधिकाऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला, तर केरळमध्ये शेतात काम करणाऱ्या एका ८५ वर्षीय वृद्धाचा उष्णतेच्या लाटेमुळे मृत्यू झाला आहे. तर आज महाराष्ट्रातील अकोला येथे सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.

वाढत्या उन्हाचा धोका लक्षात घेता ओडिशा सरकारने जनगणनेच्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना (SOP) जारी केल्या आहेत. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत उन्हात काम करण्यास मनाई करण्यात आली आहे. मात्र, प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना वाढत्या तापमानात काम करावे लागत असल्याने त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या मृत्यूंची दखल घेतली असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.