उत्तर प्रदेशातील पेट्रोल पंप व्यवस्थापकावर गुन्हा दाखल

उत्तर प्रदेश : रुग्णवाहिकेत डिझेल नसल्यामुळे एका ५० वर्षीय गंभीर रुग्णाला वेळेवर उपचार मिळाले नाहीत आणि त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या धक्कादायक घटनेप्रकरणी उत्तर प्रदेशातील एका पेट्रोल पंप व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पेट्रोल पंपावर पुरेसा साठा उपलब्ध असतानाही इंधन देण्यास नकार दिल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बैरिया तहसीलच्या पांडेपूर गावातील रहिवासी छत्तू शर्मा (५०) यांची प्रकृती रात्री अचानक बिघडली. त्यांचे कुटुंबीय त्यांना एका खाजगी रुग्णवाहिकेतून जिल्हा रुग्णालयात घेऊन जात होते. मात्र, वाटेतच रुग्णवाहिकेतील इंधन संपले. रुग्णवाहिका चालक आणि नातेवाईकांनी जवळच असलेल्या तेंग्रही गावातील 'मेसर्स भूषण सर्व्हिस स्टेशन' या पेट्रोल पंपावर धाव घेतली.
नातेवाईकांनी पंपावरील कर्मचाऱ्यांकडे इंधनासाठी गयावया केली, मात्र साठा संपल्याचे सांगून व्यवस्थापकाने इंधन देण्यास स्पष्ट नकार दिला. जवळपास १५ मिनिटे रुग्णवाहिका तिथेच उभी होती. अखेर वेळेत उपचार न मिळाल्याने छत्तू शर्मा यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा दंडाधिकारी मंगला प्रसाद सिंह यांनी चौकशीचे आदेश दिले होते. अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली केलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रुग्णवाहिका इंधनासाठी पंपावर आल्याचे आणि त्यांना रिकाम्या हाती परत पाठवल्याचे स्पष्ट झाले. तपासणी दरम्यान पंपाच्या रेकॉर्डमध्ये ४,५९५ लिटर पेट्रोल, ४,७८४ लिटर हाय-स्पीड डिझेल आणि ३,४७५ लिटर प्रीमियम पेट्रोल उपलब्ध असल्याचे दिसून आले. व्यवस्थापकाने इंधन नसल्याचा केलेला दावा निव्वळ खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे.
पुरवठा निरीक्षक इंद्रेश कुमार तिवारी यांच्या तक्रारीवरून व्यवस्थापक अशोक कुमार भारती याच्या विरोधात 'अत्यावश्यक वस्तू कायद्या'च्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडियन ऑइलच्या प्रतिनिधींनीही घटनास्थळाची पाहणी केली असून, या पेट्रोल पंपाचा परवाना रद्द करण्याची शिफारस केली जाण्याची शक्यता आहे. सध्या आरोपी व्यवस्थापक फरार असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.