गोवा बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर; मुलींची कामगिरी सरस

९४.३७ टक्के मुलगे तर ९६.५१ टक्के मुली उत्तीर्ण; अधिकृत वेबसाइटवर निकाल उपलब्ध

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
23 mins ago
गोवा बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर; मुलींची कामगिरी सरस

पणजी: गोवा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (GBSHSE) मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या १०वी (SSC) परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. यंदा राज्याचा एकूण निकाल ९४.५१% लागला असून मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. यंदा ९४.३७ टक्के मुलगे तर ९६.५१ टक्के मुली उत्तीर्ण झाले आहेत. यंदाच्या परीक्षेला एकूण २०,६१८ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी १९,४८६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.या निकालाची घोषणा मंडळाचे अध्यक्ष भगिरथ शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत केली. यावेळी विद्यादत्त नाईक, भारत चोपडे आणि रीमा मडगावकर उपस्थित होते. 



विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर आपले गुण पाहता येतील.

विद्यार्थी आपला निकाल gbshse.in आणि results.gbshsegoa.net या वेबसाइट्सवर पाहू शकतील. याशिवाय, विद्यार्थ्यांना आपली मार्कशीट 'डिजीलॉकर' सारख्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरूनही डाऊनलोड करता येणार आहे. निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला रोल नंबर आणि जन्मतारीख जवळ ठेवणे आवश्यक आहे.

निकाल पाहण्यासाठी सोप्या स्टेप्स:

 * सर्वात आधी मंडळाची अधिकृत वेबसाइट gbshse.in वर जा.

 * होमपेजवर असलेल्या 'Goa Board SSC 10th Result 2026' या लिंकवर क्लिक करा.

 * तुमचा रोल नंबर आणि जन्मतारीख प्रविष्ट करा.

 * तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल, तो तपासा आणि डाऊनलोड करून ठेवा.

१७८ शाळांचे १००% यश; फोंडा तालुक्याची बाजी

गोवा बोर्डाच्या १०वीच्या निकालात राज्यातील तब्बल १७८ शाळांनी १००% यशाची परंपरा राखली आहे. यामध्ये सर्वाधिक २९ शाळा फोंडा तालुक्यातील असून, त्याखालोखाल तिसवाडी (२३), सासष्टी (२२) आणि बार्देश (१७) तालुक्यांचा क्रमांक लागतो. डिचोलीतील १४, तर केपे आणि मुरगावमधील प्रत्येकी ११ शाळांनी शंभर टक्के निकाल नोंदवला आहे. सरकारी शाळांपैकी डिचोलीतील ६ आणि पेडण्यातील ५ शाळांनी विशेष छाप पाडली आहे. एकूणच अनुदानित शाळांनी (१३७) निकालात मोठे योगदान दिले आहे.

यंदा ५४३ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत एकूण ५५० दिव्यांग विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ५४३ जण उत्तीर्ण झाले असून दिव्यांग विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी ९८.७३% इतकी प्रभावी राहिली आहे.

विषयवार निकालाची वैशिष्ट्ये:

मंडळाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, अनेक महत्त्वाच्या विषयांत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांच्या पुढे आहे.

भाषा विषय : संस्कृत, अरबी, फ्रेंच आणि पोर्तुगीज या भाषांमध्ये १००% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मराठी विषयात ९८.३८% तर कोकणी विषयात ९५.३४% निकाल लागला आहे. इंग्रजी प्रथम भाषेत ९६.६४% विद्यार्थी यशस्वी झाले आहेत.

गणित आणि विज्ञान : मूलभूत गणितात (Basic Mathematics) ९१.४४% तर प्रमाणित गणितात (Standard Mathematics) ९९.७४% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विज्ञानाचा निकाल ९४.७४% इतका लागला आहे.

उच्चांकी गुण : गणित, विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी १०० पैकी १०० गुण मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. सामाजिक शास्त्रात तब्बल ७२ विद्यार्थ्यांनी १०० गुण प्राप्त केले आहेत.

भारतीय सांकेतिक भाषेत (Indian Sign Language) ८६.७९% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, या विषयातील सर्वोच्च गुण ७८ नोंदवण्यात आले आहेत. एकूणच सर्व प्रमुख विषयांमध्ये विद्यार्थ्यांनी यंदा उत्कृष्ट कामगिरी करत राज्याच्या निकालाचा टक्का उंचावला आहे.


हेही वाचा