पहाटेच्या सुमारास रॉनिल हॉटेलजवळ अपघात; अन्य दोन पर्यटक गंभीर जखमी,

म्हापसा: बागा-कळंगुट मार्गावर रविवारी पहाटे दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातातील मृतांचा आकडा आता दोनवर पोहोचला आहे. सकाळी अनिल उगरेजीया यांचा मृत्यू झाला होता, त्यानंतर आता गंभीर जखमी असलेल्या अरुण गोडे (रा. गुजरात) या तरुणाचेही उपचारादरम्यान निधन झाले आहे. अन्य दोन जखमींवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत.
हा भीषण अपघात रविवारी पहाटे बागा येथील रॉनिल हॉटेलजवळ घडला होता. मयत आणि जखमी पर्यटक दोन वेगवेगळ्या दुचाकींवरून विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने जात असताना त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी जबरदस्त होती की सर्वजण रस्त्यावर फेकले गेले. अनिल उगरेजीया (३७) यांना कांदोळी आरोग्य केंद्रात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते, तर अरुण गोडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना बांबोळी येथील गोमेकॉ दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश आले नाही आणि उपचारादरम्यान अरुणनेही अखेरचा श्वास घेतला.
कळंगुट पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक स्नेहल मळीक आणि सहाय्यक उपनिरीक्षक रवी गावस यांनी यापूर्वीच घटनास्थळाचा पंचनामा केला असून दोन्ही दुचाकी ताब्यात घेतल्या आहेत.