नासाचा माजी फेलो आणि गेम डेव्हलपर कोल ॲलनला अटक.

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या उपस्थितीत वॉशिंग्टन हिल्टन येथे झालेल्या गोळीबार प्रकरणाने संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. या हल्ल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला ३१ वर्षीय संशयित कोल टॉमस ॲलन हा मूळचा टॉरेन्स, कॅलिफोर्निया येथील रहिवासी असून, त्याची शैक्षणिक आणि व्यावसायिक पार्श्वभूमी अत्यंत प्रभावशाली असल्याचे तपासात समोर आले आहे. एका उच्चशिक्षित आणि बुद्धीमान तरुणाने अशा प्रकारे हिंसक पाऊल का उचलले, याबाबत आता अमेरिकन तपास यंत्रणा सखोल चौकशी करत आहेत.
कोल ॲलन याने २०१७ मध्ये प्रतिष्ठित 'कॅलटेक' (Caltech) विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली होती. त्यानंतर २०२५ मध्ये त्याने कॅल स्टेट डॉमिंग्वेझ हिल्स येथून कॉम्प्युटर सायन्समध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, तो एक मेकॅनिकल इंजिनिअर, गेम डेव्हलपर आणि शिक्षक म्हणून कार्यरत होता. त्याने सी-२ एज्युकेशनमध्ये हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना शिकवणी दिली असून, २०२४ मध्ये त्याला 'टीचर ऑफ द मंथ' हा पुरस्कारही मिळाला होता. इतकेच नव्हे, तर २०१४ मध्ये त्याने नासाच्या जेट प्रोपल्शन लॅबोरेटरीमध्ये 'समर फेलो' म्हणूनही काम केले होते.
या प्रभावी कारकिर्दीसोबतच ॲलनने गेमिंग क्षेत्रातही आपली ओळख निर्माण केली होती. त्याने रेणू रसायनशास्त्रावर आधारित एक गेम विकसित केला होता आणि एका स्पेस शूटर गेमवर तो काम करत होता. व्यावसायिक आयुष्यात त्याने 'आयजेके कंट्रोल्स'मध्ये इंजिनिअर म्हणून काम करण्यासोबतच व्हीलचेअरसाठी आपत्कालीन ब्रेकिंग प्रोटोटाइपही तयार केला होता. तो ख्रिश्चन फेलोशिपचा सदस्य होता आणि रोबोटिक्स स्पर्धांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत असे.
मात्र, शनिवारी रात्री या प्रतिभावान तरुणाने वॉशिंग्टन हिल्टन हॉटेलच्या बॉलरूमजवळ सीक्रेट सर्व्हिस एजंटवर शॉटगनमधून ५ ते ८ गोळ्या झाडल्या. या हल्ल्यात एक अधिकारी जखमी झाला असून, अंगावरील बॉडी आर्मरमुळे त्याचे प्राण वाचले. या घटनेनंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, मेलानिया ट्रम्प आणि उपराष्ट्राध्यक्ष जे.डी. वान्स यांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात आले. ट्रम्प यांनी ॲलनचा उल्लेख 'लोन-वुल्फ व्हॅक जॉब' असा केला आहे. या हाय-प्रोफाइल कार्यक्रमात ॲलन पाहुणा म्हणून उपस्थित होता, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतून तो आत कसा पोहोचला, याबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सोमवारी त्याच्यावर रीतसर आरोप निश्चित केले जाणार असून, या हल्ल्यामागील नेमका हेतू काय होता, याचा शोध घेतला जात आहे.