
नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी मध्यरात्री एक मोठी दुर्घटना टळली. स्वित्झर्लंडमधील ज्यूरिखला जाणाऱ्या 'स्विस एअरलाइन्स'च्या विमानाला उड्डाण करत असताना अचानक आग लागली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत उड्डाण रद्द केले आणि सर्व प्रवाशांना धावपट्टीवरच सुरक्षित बाहेर काढले. या प्रक्रियेत ६ प्रवासी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्विस एअरलाइन्सचे 'LX147' हे एअरबस A330 विमान रात्री १:०८ वाजता उड्डाणासाठी धावपट्टीवर धावू लागले होते. त्याच वेळी विमानाचे एक इंजिन निकामी झाले आणि त्याला आग लागली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तातडीने 'टेकऑफ' रद्द करण्याचा निर्णय घेतला. विमानात २२८ प्रवासी, ४ लहान मुले आणि कर्मचारी उपस्थित होते.
विमान थांबल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून प्रवाशांना 'इमर्जन्सी स्लाइड्स' वापरून खाली उतरवण्यात आले. जे प्रवासी या स्लाइड्सचा वापर करू शकत नव्हते, त्यांच्यासाठी शिड्यांची व्यवस्था करण्यात आली. या धावपळीत सहा प्रवाशांना दुखापत झाली. सुदैवाने, विमानातील सर्व कर्मचारी सुरक्षित आहेत. या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
विमान कंपनीने अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, प्रवाशांची सुरक्षा आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. या तणावपूर्ण परिस्थितीत आमचे स्थानिक पथक प्रवाशांना मदत करत आहे. प्रवाशांच्या राहण्याची आणि पर्यायी प्रवासाची व्यवस्था केली जात आहे. तसेच, या घटनेच्या सखोल चौकशीसाठी कंपनीने एक 'टास्क फोर्स' स्थापन केला असून, तांत्रिक तज्ज्ञांचे पथक तपासणीसाठी दिल्लीला रवाना होणार आहे.
सध्या विमानतळ प्रशासनाकडून धावपट्टीची तपासणी करण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र, या घटनेमुळे काही काळ विमानतळावरील इतर उड्डाणांवर परिणाम झाला होता.