
नाशिक : महिलांच्या लैंगिक शोषणप्रकरणी (Sexual exploitation) अटकेत असलेला नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्याविरुद्ध आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे. लैंगिक शोषण व रक्कम उकळण्याचे त्याचे कारनामे बाहेर येतच आहेत. संशयित अशोक खरात याच्याविरुद्ध तब्बल ८ कोटी ७६ लाख रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर पोलीस व विशेष तपास पथकानेही (SIT) तपास सुरू केला आहे.
या प्रकरणात चार्टर्ड अकाउंटंट (सीए) ललित पोफळे यांची फसवणूक झाल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अशोक खरात याने अवतार पूजेचा बनाव करून पीडितांना भीती दाखवली व विविध कारणे सांगत मोठ्या प्रमाणात पैसे उकळले.
धार्मिक आस्थेचा गैरफायदा घेत योजनाबद्ध पद्धतीने ही फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस (Sarkarwada Police Station) ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून; पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान; लैंगिक अत्याचार व फसवणूकप्रकरणी अशोक खरात याच्यााविरुद्ध आतापर्यंत १६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात महिलांचे लैंगिक शोषण, जमिनी हडप करणे, पैसे उकळणे, बनावट बॅंक खाती उघडणे अशा अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा समावेश आहे. लैंगिक शोषणप्रकरणाची माहिती देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या पोर्टलवर तर तक्रारींचा पाऊस पडत आहे.