इस्रायल–लेबनॉन युद्धविरामात ३ आठवड्यांची वाढ : डोनाल्ड ट्रम्प

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
इस्रायल–लेबनॉन युद्धविरामात ३ आठवड्यांची वाढ : डोनाल्ड ट्रम्प

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी गुरुवारी जाहीर केले की; इस्रायल (Israel) आणि लेबनॉन (Lebanon) यांच्यातील युद्धविराम (ceasefire) आणखी तीन आठवड्यांसाठी वाढवण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. व्हाईट हाऊसमध्ये झालेल्या चर्चेनंतर ही घोषणा करण्यात आली.

सकारात्मक वातावरण : ट्रम्प 

ट्रम्प यांनी सांगितले की, दोन्ही देशांच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी झालेल्या बैठकीत सकारात्मक वातावरण होते आणि पुढील काही आठवड्यांत लेबनॉनचे राष्ट्राध्यक्ष जोसेफ औन (Joseph Aoun) आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामनी बेतान्याहू (Benjamin Netanyahu) यांची अमेरिकेला भेट होण्याची शक्यता आहे.

परिस्थिती पूर्णपणे स्थिर नाही : ट्रम्प

युद्धविराम वाढवण्याचा निर्णय घेतला असला तरी परिस्थिती पूर्णपणे स्थिर नाही, असेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. विशेषतः लेबनॉनमधील सशस्त्र संघटना हिजबुल्ला (Hezbollah) यामुळे तणाव कायम असल्याचे त्यांनी नमूद केले.

शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक वेळ मिळणार : अमेरिका

दरम्यान, अमेरिकेचे (USA) उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स (JD Vance) यांनी या निर्णयाला “ऐतिहासिक पाऊल” असे संबोधले. त्यांनी सांगितले की, ट्रम्प यांच्या थेट हस्तक्षेपामुळेच हा करार शक्य झाला.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबीओ (Marco Rubio) यांनीही या घडामोडीबाबत आशावाद व्यक्त करत म्हटले की, या तीन आठवड्यांच्या मुदतीमुळे दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी अधिक वेळ मिळणार आहे.

अमेरिका लेबनॉनला हिजबुल्लापासून संरक्षण करण्यासाठी सहकार्य करणार असल्याचेही ट्रम्प यांनी स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर, मध्यपूर्वेत शांततेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल म्हणून या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

हेही वाचा