उत्तर प्रदेश येथे भीषण अपघातात ११ ठार

ट्रकचा ब्रेक निकामी, ‍अनेक वाहनांना धडक; कारला आग; मृत पावलेल्यांमध्ये लहान मुले

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
7 hours ago
उत्तर प्रदेश येथे भीषण अपघातात ११ ठार

मिर्झापूर : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात बुधवारी रात्री भीषण अपघात होऊन ११ जणांचा मृत्यू झाला. या अपघातात लहान मुलांचाही समावेश असल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुर्घटना बुधवारी रात्री राष्ट्रीय महामार्ग १३५ वरील द्रमंदगंज घाट परिसरात घडली. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, घाट उतरत असलेल्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्याने तो समोरील ट्रकवर आदळला. या धडकेत मधोमध असलेली कार पूर्णपणे चिरडली गेली, तर साखळी अपघातात आणखी एका कारला आग लागली.

अपघातानंतर पोलीस (Uttar Pradesh Police ),  अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहनांमधून अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. मात्र, ११ जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार, मृतांपैकी सात जण मिर्झापूर (Mirzapur) येथील, तीन जण मध्य प्रदेशातील तर एक जण सोनभद्र जिल्ह्यातील आहे.

उत्तर प्रदेशचे (Uttar Pradesh)  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Chief Minister Yogi Adityanath) यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून, जखमींना योग्य उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

दरम्यान, मृतदेहांचे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले असून; नातेवाईकांना माहिती देण्यात आली आहे. अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

हेही वाचा