नेपाळ : आर्थ‌िक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा राजीनामा

सरकारला मोठा धक्का

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
8 hours ago
नेपाळ : आर्थ‌िक गैरव्यवहाराच्या आरोपांवरून गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा राजीनामा

काठमांडू : नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग (Sudan Gurung) यांनी आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने बालेन शाह (Balen Shah)  यांच्या सरकारला मोठा धक्का बसला आहे. २७ मार्च रोजी गृहमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या गुरुंग यांनी वाढत्या टीकेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला.

गुरुंग यांच्यावर एका वादग्रस्त व्यावसायिकाशी असलेले व्यावसायिक संबंध आणि शेअर व्यवहारांबाबत आरोप करण्यात आले होते. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि पदावर असताना हितसंबंधांचा संघर्ष टाळावा यासाठी आपण राजीनामा दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

पदापेक्षा नैतिकता मोठी : गुरुंग 

फेसबुकवरील आपल्या पोस्टमध्ये गुरुंग यांनी “पदापेक्षा नैतिकता मोठी असून; जनतेचा विश्वास सर्वांत महत्त्वाचा आहे” असे नमूद केले. देशात सुरू असलेल्या जनरेशन-झेड आंदोलनाने पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी अधोरेखित केल्याचेही त्यांनी सांगितले.

गृहमंत्रालयाची जबाबदारी पंतप्रधान शाह यांच्याकडे 

दरम्यान, गुरुंग यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर पंतप्रधान बालेन शाह यांनी गृहमंत्रालयाची जबाबदारी स्वतःकडे ठेवली आहे. विशेष म्हणजे, गुरुंग हे मागील वर्षी सप्टेंबरमध्ये झालेल्या जनआंदोलनात सक्रिय होते आणि आंदोलनकर्त्यांना मदत करताना दिसले होते.

मंत्री दीप कुमार साह यांना हटवले होते

याआधी ९ एप्रिल रोजी कामगार, रोजगार व सामाजिक सुरक्षा मंत्री दीप कुमार साह (Dip Kumar Sah)  यांनाही पदाचा गैरवापर केल्याच्या आरोपांमुळे पदावरून हटवण्यात आले होते. त्यांच्या जागीही पंतप्रधानांनीच जबाबदारी स्वीकारली होती.

नेपाळमध्ये सप्टेंबर २०२५ मधील व्यापक आंदोलनानंतर राष्ट्रीय स्वतंत्र पार्टी (Rastriya Swatantra Party) सत्तेत आली होती.  भ्रष्टाचार आणि जुन्या राजकीय पक्षांविरोधातील नाराजीच्या पार्श्वभूमीवर सत्तेत आलेल्या या सरकारसमोर आता पुन्हा एकदा विश्वासार्हतेचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.

हेही वाचा