पर्शियन आखातात तणाव:समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर हल्ल्याचा धोका!

भारतासह जगभरातील कनेक्टिव्हिटी धोक्यात

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
4 hours ago
पर्शियन आखातात तणाव:समुद्राखालील इंटरनेट केबल्सवर हल्ल्याचा धोका!

तेहरान : पर्शियन आखातात वाढत्या भू-राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर आता जागतिक इंटरनेट सेवांवर मोठा धोका (Global Internet at Risk) निर्माण झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणकडून संभाव्य डिजिटल हल्ल्याची तयारी सुरू असल्याचा इशारा मिळत असून, समुद्राखालील महत्त्वाच्या इंटरनेट केबल्स लक्ष्य केल्या जाऊ शकतात, अशी चर्चा रंगली आहे.

इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्सशी (Islamic Revolutionary Guard)  संबंधित मानल्या जाणाऱ्या तस्नीम या वृत्तसंस्थेने पर्शियन आखातातील समुद्राखालील इंटरनेट केबल्सचा नकाशा प्रसिद्ध केला आहे. या नकाशामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली असून, याकडे संभाव्य इशारा म्हणून पाहिले जात आहे.

‌डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी महत्त्वाची

विशेषतः होर्मुझची सामुद्रधुनी (Strait of Hormuz)  ही केवळ ऊर्जा वाहतुकीसाठीच नव्हे, तर जागतिक डिजिटल कनेक्टिव्हिटीसाठीही (Digital Connectivity)  अत्यंत महत्त्वाची मानली जाते. या मार्गातून अनेक मोठ्या डेटा केबल प्रणाली जातात, ज्या आशिया, मध्यपूर्व आणि युरोपला जोडतात.

तज्ज्ञांच्या मते, जर या केबल्सवर हल्ला झाला तर त्याचे दूरगामी परिणाम दिसू शकतात. भारतासारख्या उच्च डेटा वापर असलेल्या देशांमध्ये इंटरनेटचा वेग कमी होणे, सेवा खंडित होणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. याशिवाय क्लाउड सेवा, ऑनलाइन व्यवहार आणि डिजिटल पेमेंट प्रणालीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

या समुद्री नेटवर्कमध्ये ओमान, युएई आणि पाकिस्तान यांसारख्या देशांतील लँडिंग स्टेशनचा समावेश आहे. सध्या या प्रदेशातील अनेक देश युद्धाच्या छायेखाली असल्याने परिस्थिती अधिकच संवेदनशील बनली आहे.

दरम्यान, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवर थेट हल्ला होण्याची शक्यता प्रथमच इतक्या गंभीरतेने पुढे येत असल्याने; जागतिक स्तरावर चिंता वाढली आहे. संभाव्य धोका लक्षात घेता विविध देश आणि तंत्रज्ञान कंपन्या सतर्क झाल्या असून, इंटरनेट सेवांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित होत आहे.


हेही वाचा