जागतिक तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या; सर्वसामान्यांच्या खिशाला बसणार मोठा फटका

नवी दिल्ली: देशात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असतानाच, सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतात लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होण्याची दाट शक्यता आहे. विशेषतः विधानसभा निवडणुकांचे मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, तेल विपणन कंपन्या इंधन दरात प्रति लिटर २५ ते २८ रुपयांची मोठी वाढ करण्याची शक्यता एका ताज्या अहवालातून समोर आली आहे.
गेल्या महिनाभरापासून पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक तेल बाजार कमालीच्या तणावाखाली आहे. पुरवठ्याचे प्रमुख मार्ग, विशेषतः 'होर्मुझ'च्या अस्थिरतेमुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. ऊर्जा आयात करणाऱ्या अनेक देशांनी आधीच पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवले असताना, भारतात मात्र तेल कंपन्यांनी सध्या हे दर स्थिर ठेवले आहेत. मात्र, हा दिलासा केवळ निवडणुकांपुरता मर्यादित असल्याचे दिसून येत आहे.
'कोटक इन्स्टिट्यूशनल इक्विटीज' या देशांतर्गत ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात नमूद केले आहे की, २९ एप्रिल रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा पार पडल्यानंतर इंधन दरांचा मोठा शॉक बसू शकतो. जर कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल १२० डॉलरच्या आसपास पोहोचली, तर तेल कंपन्यांना आपले मोठे नुकसान भरून काढण्यासाठी प्रति लिटर २५ ते २८ रुपयांपर्यंत वाढ करणे अपरिहार्य ठरेल. भारत आपल्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक तेल आयात करत असल्याने आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर होतो.
सध्या भारताचे आयात बिल दररोज १९० ते २१० दशलक्ष डॉलर्सनी वाढले आहे. रशिया-युक्रेननंतर आता इराण, अमेरिका आणि इस्रायल यांच्यातील संघर्षामुळे पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती आहे. जर ही परिस्थिती लवकर निवळली नाही, तर तेल कंपन्या सध्या सोसत असलेले नुकसान भरून काढण्यासाठी निवडणुकीनंतर दरवाढीचा कठोर निर्णय घेऊ शकतात. यामुळे महागाईचा नवा भडका उडण्याची शक्यता असून सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडू शकते.