चेक आउटदरम्यान बॅगा तपासताच हॉटेल कर्मचारीही झाले चकित; परदेशात भारतीयांच्या वर्तनावर पुन्हा एकदा चर्चा

बाली : इंडोनेशियातील बाली (Bali,Indonesia) बेटावरील गियान्यार परिसरातील असवरा रिसॉर्ट उबुद (Asvara Resort Ubud) येथे चार भारतीय पर्यटकांशी संबंधित एक वादग्रस्त घटना समोर आली आहे. चेकआउट दरम्यान हॉटेल कर्मचाऱ्यांनी केलेल्या तपासणीत त्यांच्या बॅगमध्ये रिसॉर्टमधील विविध वस्तू आढळल्याचा आरोप करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित भारतीय पर्यटकांनी (Indian tourists) १६ एप्रिल रोजी दोन खोल्यांचे बुकिंग करून मुक्काम केला होता. १९ एप्रिल रोजी सकाळी चेकआउट करताना नियमित तपासणीत काही खोलीतील वस्तू गायब असल्याचे कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले. त्यानंतर संशयितांच्या बॅगची तपासणी करण्यात आली.
तपासणीदरम्यान बॅगेतून टॉवेल, बाथरोब, हेअर ड्रायर, डोअरमॅट, जेवणाचे भांडे तसेच टीव्ही रिमोट बॉक्स अशा वस्तू आढळल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात कर्मचाऱ्यांकडून बॅगा उघडून वस्तू बाहेर काढताना दिसत आहेत, तर पर्यटक बाजूला उभे असल्याचे दृश्य आहे.
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल व्यवस्थापनाने तत्काळ चेकआउट प्रक्रिया थांबवून स्पष्टीकरण मागितले. मात्र, प्रकरण वाढवण्याऐवजी रिसॉर्टने तो अंतर्गत स्तरावर सोडवण्याचा निर्णय घेतला. संबंधित पर्यटकांनी सर्व वस्तू परत केल्याने कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही.
या घटनेनंतर पर्यटकांना निघण्याची परवानगी देण्यात आली. तथापि, या प्रकारामुळे सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, परदेशात भारतीय पर्यटकांच्या वर्तनाबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.