जिममध्ये कसरत करताना मेंदूची नस फाटली; तरुणाला अर्धांगवायूचा झटका

नागपूरच्या डॉक्टरांनी दिले जीवदान

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
5 hours ago
जिममध्ये कसरत करताना मेंदूची नस फाटली; तरुणाला अर्धांगवायूचा झटका

नागपूर : शरीर सुडौल आणि पिळदार बनवण्याच्या नादात स्वतःच्या क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम करणे किती जीवावर बेतू शकते, याचा धक्कादायक अनुभव नागपुरात समोर आला आहे. जिममध्ये अनेक तास अतिव्यायाम केल्यामुळे मेंदूतील रक्तवाहिनी फाटून अर्धांगवायूचा (पॅरालिसीस) झटका आलेल्या एका २३ वर्षीय तरुणाला डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून मृत्यूच्या दारातून सुखरूप बाहेर काढले.

ओम भोयर हा २३ वर्षीय तरुण १० एप्रिल रोजी नेहमीप्रमाणे जिममध्ये व्यायाम करून घरी परतला. मात्र, घरी आल्यावर काही वेळातच तो अचानक बेशुद्ध पडला. ओमची आई स्वतः नर्स असल्याने त्यांनी प्रसंगावधान राखले. मुलाची अवस्था पाहून हा पॅरालिसीसचा अटॅक असल्याचे त्यांनी ओळखले आणि वेळ न घालवता डॉक्टरांशी संपर्क साधला. आईच्या या सतर्कतेमुळेच ओमला वेळेत उपचार मिळणे शक्य झाले.

न्युरोव्हॅस्क्युलर स्पेशालिस्ट डॉ. सचिन ढोमणे यांनी तपासणी केली असता, एमआरआय अहवालात ओमच्या मेंदूतील रक्तवाहिनी फाटून तिथे रक्ताची गुठळी साचल्याचे गंभीर निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णाला तातडीने क्रीसेंट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी डॉ. ढोमणे यांनी 'इंडोव्हॅस्कूलर सर्जरी' करण्याचा धाडसी निर्णय घेतला. 'मेकॅनिकल थ्रोम्बेक्टॉमी' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रुग्णाच्या पायातून कॅथेटर टाकून मेंदूतील अडकलेली रक्ताची गुठळी न्युरो स्टेंटच्या साहाय्याने बाहेर काढण्यात आली. या कौशल्यामुळे मेंदूचा रक्तप्रवाह पुन्हा सुरळीत झाला आणि मृत्यूशी झुंज देणारा ओम हळूहळू उपचारांना प्रतिसाद देऊ लागला. सुमारे १० दिवसांच्या अथक उपचारानंतर ओम पूर्णपणे बरा झाला आणि २१ एप्रिल रोजी स्वतःच्या पायावर चालत घरी परतला.

शस्त्रक्रियेनंतर ओमची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला काही काळ व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांचे कौशल्य आणि आईच्या प्रसंगावधानामुळे दहा दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर २१ एप्रिल रोजी ओम पूर्णपणे बरा होऊन आपल्या स्वतःच्या पायावर चालत घरी परतला. अर्धांगवायूचा झटका आलेल्या रुग्णांसाठी पहिले ६ तास हे 'गोल्डन अवर' मानले जातात. या काळात उपचार मिळाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असते, असे डॉ. ढोमणे यांनी यावेळी आवर्जून सांगितले. स्ट्रेचरवर आलेल्या तरुणाने चालत घरी जाणे, हे वैद्यकीय पथकासाठी मोठे यश मानले जात आहे.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलचे संचालक डॉ. अजीज खान यांनी तरुणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. व्यायाम करताना स्वतःच्या शरीराची क्षमता ओळखणे अत्यंत गरजेचे असून, नेहमी प्रमाणित (सर्टिफाइड) जिम प्रशिक्षकाच्या देखरेखीखालीच कसरत करावी, असा सल्ला त्यांनी दिला आहे. व्यायाम सुरू करण्यापूर्वी एकदा वैद्यकीय तपासणी करून घेणे आणि अतिउत्साहात स्वतःच्या जिवाशी खेळ न करणे हेच हिताचे असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे. ही घटना जिम लावणाऱ्या हजारो तरुणांसाठी एक धोक्याची घंटा ठरली आहे.

हेही वाचा