भररस्त्यात मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने म्हटले ‘गेट आऊट’

मुंबईच्या ट्रॅफिक जॅममुळे महिला प्रवाशाचा संताप

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
22nd April, 08:27 pm
भररस्त्यात मंत्री गिरीश महाजन यांना महिलेने म्हटले ‘गेट आऊट’

मुंबई : महिला आरक्षणासंदर्भात महायुतीने वरळीत काढलेल्या निषेध मार्चमुळे मुंबईत प्रचंड वाहतूक कोंडी झाली. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकून पडल्यामुळे एका महिला प्रवाशाचा संयम सुटला आणि तिने थेट भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांना गाठून आपला रोष व्यक्त केला आणि त्यांना ‘गेट आऊट’ असे म्हटले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला असून विरोधकांनी यावरून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
२१ एप्रिल रोजी संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर न झाल्याच्या निषेधार्थ महायुतीकडून वरळी परिसरात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चामुळे दुपारच्या सुमारास वरळी आणि आसपासच्या परिसरातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. याच गर्दीत अडकलेल्या एका महिलेने गाडीतून उतरून थेट गिरीश महाजन यांच्यासमोर जाऊन संताप व्यक्त केला. महिलेच्या या धाडसाचे नेटकऱ्यांनी कौतुक केले आहे.
या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. भाजपच्या पोकळ घोषणांपेक्षा एका सामान्य महिलेचा आवाज अधिक शक्तिशाली ठरला. इव्हेंट मॅनेजमेंटच्या नादात सर्वसामान्यांना वेठीस धरणाऱ्या भाजपचा खरा चेहरा या घटनेने समोर आणला आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली. राजकीय आंदोलनांच्या नावाखाली तासनतास जनतेला वेठीस धरणे अयोग्य आहे. एखाद्याला तातडीची वैद्यकीय मदत हवी असू शकते. जनतेला ओलीस धरून आपली शक्ती दाखवणे चुकीचे आहे, असे आमदार रोहित पवार यांनी म्हटले.
‘केवळ देखावा’ : विरोधकांचे टीकास्त्र
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या महिलेचे ‘शूर’ असे वर्णन केले. आज फक्त एका मंत्र्याला लोकांनी सुनावले आहे, येत्या काळात देशातील महिला भाजपला सत्तेचा रस्ता दाखवतील, असा राजकीय इशाराही त्यांनी दिला. लोकांना तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकवून ठेवल्यामुळे निर्माण झालेला हा संताप म्हणजे भाजपच्या ‘इव्हेंट’ संस्कृतीविरुद्ध उमटलेली जनभावना असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

महिलेवर गैरवर्तनाचा आरोप

महाजन यांनी मान्य केले की वाहतूक कोंडीमुळे लोकांना त्रास झाला, परंतु त्या महिला प्रवाशाचे वर्तन अयोग्य होते. त्यांच्या दाव्यानुसार, त्या महिलेने अमर्यादित भाषा वापरली, प्रदर्शकांवर बाटल्या फेकल्या आणि उपस्थित पोलिसांशीही हुज्जत घातली. परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न: महाजन यांनी सांगितले की, त्यांनी स्वतः त्या महिलेची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मी त्या महिलेला आश्वासन दिले होते की पुढील १० मिनिटांत रस्ता रिकामा केला जाईल. तिला झालेल्या त्रासाबद्दल मी वैयक्तिकरित्या तिची माफीही मागितली होती, असे महाजन म्हणाले. महाजन यांनी काही अंशी त्या महिलेच्या परिस्थितीबद्दल सहानुभूतीही व्यक्त केली. ते म्हणाले, ती आपल्या मुलाला शाळेतून आणण्यासाठी घाईत होती, त्यामुळे तिचा राग एका मर्यादेपर्यंत रास्त आहे.

हेही वाचा