स्थानिक मच्छिमारांनीच पकडल्या कर्नाटकातील ६ मच्छिमारी बोटी

बाणावली किनारी कारवाई : बेकायदेशीरपणे मासेमारी केल्याचा आरोप

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
स्थानिक मच्छिमारांनीच पकडल्या कर्नाटकातील ६ मच्छिमारी बोटी

मडगाव : गोव्याच्या सागरी हद्दीत बेकायदेशीरपणे मासेमारी करणाऱ्या परराज्यातील मच्छिमारांविरुद्ध स्थानिक गोमंतकीय मच्छिमारांनी आक्रमक पवित्रा घेतला. बाणावली, कोलवा, वार्का आणि कासावली येथील मच्छिमारांनी एकत्र येत कर्नाटक राज्यातील मालपे आणि कारवार येथील ६ आंतरराज्य मासेमारी नौका पकडून बाणावलीच्या किनाऱ्यावर आणल्या आहेत.

स्थानिक मच्छिमारांनी दिलेल्या माहितीनुसार, मालपे आणि कारवार येथील अनेक ट्रॉलर्सनी कोलवा, बाणावली आणि कासावली जवळच्या गोव्याच्या सागरी हद्दीत घुसखोरी केली होती. हे परराज्यातील ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणावर मासळीची लूट करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. या घुसखोरीमुळे गोव्यातील पारंपरिक मच्छिमारांच्या जाळ्यात मासळी सापडत नसल्याने त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न गंभीर झाला आहे.

परराज्यातील मच्छिमार मोठ्या ट्रॉलर्सचा वापर करून मासळीचा साठा संपवत आहेत. वारंवार सूचना देऊनही हे ट्रॉलर्स गोव्याच्या किनारपट्टीजवळ ५ नॉटिकल मैलाच्या आत येऊन मासेमारी करतात. मासळी कमी झाल्यामुळे स्थानिक मच्छिमारांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे, ज्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

मच्छिमारांनी पकडलेल्या या सहा बोटी आता स्थानिक पोलीस आणि मत्स्यव्यवसाय विभागाच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. सरकारने या घुसखोरीवर कडक निर्बंध घातले नाहीत, तर आम्ही यापुढे आणखी तीव्र आंदोलन करू, असा इशारा स्थानिक मच्छिमार नेत्यांनी दिला. 

हेही वाचा