सहा पोलीस उपनिरीक्षकांना निरीक्षक पद बहाल

पोलीस महानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांच्याकडून आदेश जारी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
3 hours ago
सहा पोलीस उपनिरीक्षकांना निरीक्षक पद बहाल

पणजी : पोलीस खात्यातील सहा निरीक्षकांची पदावनती (डिमोशन) करण्यात आली होती. हा आदेश रद्द करून पदावनती केलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा निरीक्षक पद बहाल करण्यात आले आहे. याबाबतचा आदेश पोलीस महानिरीक्षक अजय कृष्णन शर्मा यांनी जारी केला आहे.

जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार, पोलीस अधिकारी टेरेंस वाझ हंगामी निरीक्षकपदी तर संध्या गुप्ता, विलेश दुर्भाटकर, सुनील गुडलर, सुशांत गावस आणि राहुल धामशेकर यांना कार्यवाहक निरीक्षक पद बहाल करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्याविरोधात असलेल्या गुन्हेगारी किंवा इतर स्वरुपाच्या खटल्याचा निकाल आल्यानंतर त्यांच्यावर पुढील कारवाई होणार असल्याचा स्पष्ट उल्लेख आदेशात करण्यात आला आहे.

पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार वरील आदेश जारी करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक आनंद नार्वेकर यांनी गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात २०२५ मध्ये याचिका दाखल केली होती. त्यात त्यांनी आपल्यावर अन्याय झाल्याचा दावा केला होता. त्यांनी आपल्याबरोबर खात्यात सेवेत रुजू झालेल्या चार उपनिरीक्षकांना पदोन्नती दिल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. त्यांच्यासह इतर अधिकाऱ्यांविरोधात गुन्हेगारी स्वरूपाचा खटला सुरू आहे. मात्र, पोलीस स्थापना मंडळाने त्या चार अधिकाऱ्यांची पदोन्नती करण्याची शिफारस केली होती. त्यानुसार, ३० जून २०२२ रोजी त्या चार जणांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली. मात्र, आदेशावर सदर अधिकारी दोषी ठरल्यास त्यांची पदावनती केली जाणार असल्याचे नमूद करण्यात आले होते. याला हरकत घेत नार्वेकर यांनी आपल्याला वगळून आपल्याबरोबरच्या चार जणांना निरीक्षकपदी बढती दिल्याचा मुद्दा न्यायालयात उपस्थित केला होता. या याचिकेची सुनावणी सुरू असताना नार्वेकर यांच्या संदर्भात सहा महिन्यांत निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस खात्याने न्यायालयात दिली होती. यावर काहीच झाले नसल्यामुळे नार्वेकर यांनी पुन्हा न्यायालयात धाव घेऊन अवमान याचिका दाखल केली. या याचिकेची सुनावणी सुरू असताना पोलीस स्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार वरील सहा अधिकाऱ्यांची पदावनती (डिमोशन) करण्यात आली होती. ती आता रद्द करून पुन्हा निरीक्षक पद बहाल करण्यात आले. मात्र, पोलीस खात्याने उपनिरीक्षक आनंद नार्वेकर यांच्या संदर्भात अजून निर्णय घेतलेला नाही.

कोणाला मिळाले पद?

टेरेंस वाझ – हंगामी निरीक्षक

संध्या गुप्ता – कार्यवाहक निरीक्षक

विलेश दुर्भाटकर – कार्यवाहक निरीक्षक

सुनील गुडलर – कार्यवाहक निरीक्षक

सुशांत गावस – कार्यवाहक निरीक्षक

राहुल धामशेकर – कार्यवाहक निरीक्षक 

हेही वाचा