पोलिसांच्या तपासात मित्रांचे असहकार्य : रक्ताच्या अहवालाची प्रतीक्षा

म्हापसा : वागातोर येथील ‘रईथ’ या नाईट क्लबच्या आवारात ड्रग्जच्या अतिसेवनामुळे इंदूर (मध्य प्रदेश) येथील ईशान सिंग बडगुजर (२१) या युवकाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हणजूण पोलिसांचा तपास सुरू असून, मृताला ड्रग्ज पुरवणाऱ्याचा अद्याप शोध लागलेला नाही. तसेच, मृताचे मित्र तपासात सहकार्य करत नसल्याने पोलीस त्यांना आता नवीन नोटीस बजावणार आहेत.
हणजूण पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासासाठी मृत ईशानच्या आठही मित्रांना भारतीय न्याय संहिता कलम ३५(३) अंतर्गत नोटीस बजावून गेल्या १५ एप्रिल रोजी पोलीस स्थानकात हजर राहण्याचा आदेश दिला होता. परंतु, दिलेल्या मुदतीत या मित्रांपैकी एकही जण तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहिला नाही. या नोटिशीला संबंधितांनी हुलकावणी दिली असल्याने, ईशानच्या मित्रांच्या या असहकार्यामुळे पोलीस आता त्यांच्याविरुद्ध कडक पावले उचलण्याच्या तयारीत आहेत. सोमवारपर्यंत या आठही जणांना पुन्हा नवीन नोटीस पाठवण्याची शक्यता आहे.
वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा
या गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी हणजूण पोलिसांचे एक पथक नुकतेच इंदूरला गेले होते. तेथे स्थानिक प्रशासनाच्या मदतीने ईशानच्या आठपैकी सात मित्रांचे सरकारी इस्पितळात रक्ताचे नमुने घेण्यात आले. वेर्णा येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेतून या नमुन्यांचा अहवाल अद्याप आलेला नसून, पोलीस त्याची प्रतीक्षा करत आहेत. या वैद्यकीय अहवालानंतरच पोलिसांच्या तपासाची पुढील दिशा ठरणार आहे.
ड्रग्ज ओव्हरडोसचा गुन्हा दाखल
१) मृत ईशान सिंग बडगुजर याचा एप्रिलमध्ये मृत्यू झाला होता. वागातोर येथे आयोजित ‘ब्लॅक कॉफी’ संगीत रजनी पार्टी रद्द झाल्यानंतर मध्यरात्री ईशान आणि त्याच्या मित्रांचा गट ‘रईथ’ नाईट क्लबमध्ये पार्टीसाठी गेला होता.
२) तिथे ईशान कोसळला आणि पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास म्हापसा जिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
३) रॅपिड बेडसाइड टॉक्सिकोलॉजी स्क्रिनिंग चाचणीमध्ये मृताच्या शरीरात दारूसह अॅम्फेटामाइन, मेथॅम्फेटामाइन, एमडीए-एक्स्टसी, कॅनाबिस आणि बेंझोडायझेपाइन्स या सर्व ड्रग्जचे एकत्रित (कॉकटेल) सेवन केल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पोलिसांनी या मृत्यू प्रकरणी ड्रग्ज ओव्हरडोसचा गुन्हा दाखल केला होता.