साखळीतील रवींद्र भवनात स्वीकारणार शुभेच्छा

पणजी : वाढदिनानिमित्त मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २४ एप्रिल रोजी जनहितार्थ विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत.
सकाळी ९.३० वाजता साखळी येथील गोवा कॉलेज ऑफ नॅचरोपथी अँड योगिक सायन्स येथे हेल्थ विथ आयुर्वेद शिबिराचे उद्घाटन मुख्यमंत्री करतील. सकाळी १०.४५ वा. मुख्यमंत्री साखळी येथील प्रोग्रेस हायस्कूलला भेट देऊन ‘करिअर जागोर’ या करिअर समुपदेशन उपक्रमात सहभागी होतील. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री साखळी येथील रवींद्र भवन येथे सर्वसामान्य जनतेला भेटण्यासाठी उपलब्ध असतील.
हेल्थ विथ आयुर्वेद शिबिराचा मुख्य उद्देश, पारंपारिक आयुर्वेदिक पद्धतींच्या माध्यमातून प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि सर्वांगीण स्वास्थ्याचा प्रचार करणे हा आहे. या शिबिरात भारताच्या प्राचीन वैद्यकीय पद्धतीवर आधारित जीवनशैली व्यवस्थापनाविषयी समुपदेशन, आरोग्य तपासणी आणि जनजागृती केली जाईल. तसेच नागरिकांना आरोग्यासाठी नैसर्गिक आणि शाश्वत दृष्टिकोन स्वीकारण्यास प्रोत्साहित केले जाईल. २५ एप्रिल रोजी हे शिबिर मडगाव येथील श्री दामोदर कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्स येथे आयोजित केले जाईल. तसेच या उपक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी आगामी काही आठवड्यांमध्ये हे आयुर्वेद शिबिर राज्यभरातील विविध ठिकाणी आयोजित केले जाणार आहे. मधुमेह, लठ्ठपणा आणि महिलांशी संबंधित आरोग्य समस्यांसारख्या विकारांचे प्रभावीपणे व्यवस्थापन आणि नियंत्रण करण्यासाठी, लोकांना सर्वांगीण उपचार पद्धती व जीवनशैलीतील सकारात्मक बदल स्वीकारण्यास मदत करणे, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
‘करिअर जागोर’ हा उपक्रम १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक क्षेत्रातील निर्णय घेताना योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी सरकारने केलेला प्रयत्न आहे. विविध शाळांमधील शिक्षकांना करिअर ॲम्बेसेडर (करिअर दूत) म्हणून प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षित शिक्षकांमार्फत दिल्या जाणाऱ्या सुनियोजित आणि वैयक्तिक समुपदेशनाद्वारे, विद्यार्थ्यांच्या मनातील संभ्रम दूर करून त्यांना स्पष्टता, योग्य दिशा आणि भविष्यातील करिअरच्या नव्या संधींशी सुसंगत पर्याय उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा मानस आहे. हा उपक्रम संबंधित शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी तेथीलच करिअर ॲम्बेसेडर्सद्वारे राबवला जाईल.